राष्ट्रकुलचे रिंगण आजपासून! ग्लासगो येथे रंगणाऱ्या स्पर्धेत भारताचे एकूण १२६ खेळाडू होणार सहभागी 
क्रीडा

राष्ट्रकुलचे रिंगण आजपासून! ग्लासगो येथे रंगणाऱ्या स्पर्धेत भारताचे एकूण १२६ खेळाडू होणार सहभागी

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार संपून अवघे तीन दिवस झाले असतानाच आता भारतासह जगभरातील क्रीडा चाहत्यांना आणखी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. ग्लासगो येथे गुरुवार, २३ जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये भारताचे १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा थरार संपून अवघे तीन दिवस झाले असतानाच आता भारतासह जगभरातील क्रीडा चाहत्यांना आणखी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वेध लागले आहेत. ग्लासगो येथे गुरुवार, २३ जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (कॉमनवेल्थ गेम्स) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये भारताचे १२६ खेळाडू सहभागी होणार आहेत. २ ऑगस्टपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट अपेक्षित आहे.

यंदा राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. खर्च आवाक्याबाहेर गेल्याने दोन शहरांनी आधीच या स्पर्धेचे यजमानपद नाकारले होते. तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने बऱ्याच खेळांना वगळण्यात आले. बॅडमिंटन, बीच व्हॉलीबॉल, क्रिकेट, डायव्हिंग, हॉकी, माऊंटेन बायकिंग, तालबद्ध जिम्नॅस्टिक्स, रोड सायकलिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन असे विविध खेळ व त्यांचे प्रकार यावेळी स्पर्धेचा भाग नसतील.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद भूषवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर नक्कीच संपूर्ण विश्वाचे लक्ष असेल. २०३०मध्ये अहमदाबादला राष्ट्रकुल होईल. त्यापूर्वी यंदा आपले क्रीडापटू किती पदके जिंकणार, हे पाहणे निर्णायक ठरेल.

सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धादेखील होणार आहे. यंदा राष्ट्रकुलमध्ये ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत भारताला पदकांची अधिक अपेक्षा आहे. कारण भालाफेकीत नीरज चोप्रा, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती लव्हलिना बोर्गोहीन यांच्यावर भारताची भिस्त असेल.

भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते, जिथे १०१ पदकांसह (३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य) सर्वोत्तम दुसरी कामगिरी नोंदवली होती. त्या तुलनेत आता क्रीडा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून गेम्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि विविध क्रीडा स्थळांमधील थेट समन्वय समजून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे भारताचे पथक प्रमुख ५५ वर्षीय रोहित राजपाल यांनी नमूद केले. भारत या स्पर्धेत आठ खेळांमध्ये सहभागी होणार असून ३x३ बास्केटबॉल आणि नेटबॉलमधून माघार घेतली आहे. यात नेमबाजी, कुस्ती, हॉकी आणि बॅडमिंटन हे मुख्य खेळ नसल्यामुळे पदकांच्या संख्येची थेट तुलना करणे अयोग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्लासगो येथील आठ मैलांच्या परिघात चार मुख्य ठिकाणांवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार असून खेळाडूंसाठी पारंपरिक क्रीडाग्रामऐवजी हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी फिरत्या बसची सुविधा आणि रात्रीच्या वेळी भारतीय जेवणाची सोय करणाऱ्या उपाहारगृहांची निश्चिती करण्यात आली आहे. तसेच एका १६ वर्षीय अपंग सायकलपटूच्या प्रशिक्षकासोबतच्या प्रवासाबाबतचा प्रश्नही सोडवण्यात आला असून तिच्यासाठी योग्य मदतनीस आणि प्रशिक्षकाची सोय करण्यात आल्याची माहिती राजपाल यांनी दिली. त्यामुळे आता एकूणच फिफा विश्वचषकानंतर राष्ट्रकुलचे वेध लागले आहेत.

दिवस पहिला

  • लॉन बॉल : भारतीय पुरुष (दुपारी २ वाजल्यापासून)

  • लॉन बॉल : भारतीय महिला (सायंकाळी ६ वाजल्यापासून)

  • उद्घाटन सोहळा : अंदाजे रात्री १०.३० वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, २, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप

क्रीडाप्रकारांत घट; पदकसंख्येचे काय?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गेल्या दोन दशकांपासून अव्वल पाच देशांमध्ये स्थान टिकवून ठेवण्याच्या आपल्या यशस्वी परंपरेला कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ओव्हीओ हायड्रो येथे गुरुवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याने या बहुक्रीडा स्पर्धेचा औपचारिक प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याने वाढत्या खर्चामुळे माघार घेतल्यानंतर ग्लासगो शहराने या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. तब्बल १६ कोटी पाउंड (सुमारे ६० टक्के कमी) या अत्यंत मर्यादित खर्चात, विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून ही स्पर्धा पार पडत आहे. यंदाच्या स्पर्धेत ७४ देशांतील सुमारे ३ हजार खेळाडू केवळ १० खेळांमध्ये आणि ४ क्रीडा संकुलांमध्ये भाग घेतील.

यंदाच्या राष्ट्रकुलमधून कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि नेमबाजी यांसारख्या खेळांना वगळण्यात आल्यामुळे भारताच्या पदकसंख्येवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी बर्मिंघम येथे भारताने मिळवलेल्या ६१ पदकांपैकी तब्बल २५ पदके (ज्यात १० सुवर्णपदकांचा समावेश होता) याच चार खेळांमधून आली होती. यामुळे यंदा अव्वल पाच देशांत स्थान मिळवणे भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक मानले जात आहे. ही पोकळी भरून काढण्याची मुख्य जबाबदारी आता ॲथलेटिक्स, बॉक्सिंग आणि भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) या तीन प्रमुख खेळांवर असणार आहे.

ॲथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक ३२ खेळाडूंचा ताफा उतरवला आहे. यात दोन वेळेचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रमुख आकर्षण असेल. गेल्या महिन्यात रोम डायमंड लीगमध्ये ९२.६२ मीटर भाला फेकून विजय मिळवणारा श्रीलंकेचा रुमेश तरंगा आणि पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम यांच्यामुळे नीरजसमोर खडतर आव्हान असणार आहे. याशिवाय हायजंपर सर्वेश कुशारे, लाँगजंपर मुरली श्रीशंकर, ट्रिपलजंपर प्रवीण चित्रवेल आणि ४x४०० मीटर रिले संघांकडून पदकांच्या अपेक्षा आहेत.

भारोत्तोलनात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती ३१ वर्षीय मीराबाई चानू सुवर्णपदकाची हॅटट्रिक साध्य करण्यासाठी मैदानात उतरेल. राष्ट्रीय शिबिरातील खेळाडूंच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) पॉझिटिव्ह आल्यामुळे भारोत्तोलन पथक ११ खेळाडूंपर्यंत मर्यादित झाले आहे. बॉक्सिंगमध्ये तोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहाईन (७५ किलो), ५७ किलो गटातील जगज्जेती जास्मिन लंबोरिया, आशियाई विजेती प्रीती पवार (५४ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुरुषांमध्ये नरिंदर बेरवाल (+९० किलो) आणि सचिन सिवाच (६० किलो) पदकांचे प्रमुख दावेदार असतील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण