भारताने ५४व्या आशियाई स्पर्धेत महिला गटातील शरीरसौष्ठवात ५५ किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्णपदक पटकाविले. डॉली सैनीने थायलंड आणि व्हिएतनामच्या खेळाडूंना मागे टाकले. ज्युनिअर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात सोलिमला जाजो हिने रौप्य पदक मिळविले. याच प्रकारात भाविका प्रधानला कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या इन्स्पेक्टरपाठोपाठ डॉक्टर मंजिरी भावसारनेही पदक विजेती कामगिरी केली. तिने मॉडेल फिजीक प्रकारात अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत कांस्यपदक जिंकले. सोमवारी चार सुवर्णांसह १२ पदके जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह चार पदके जिंकली.
महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या. महिलांच्या गटावर पूर्णपणे वर्चस्व थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या खेळाडूंचे राहिले. या तिन्ही देशांचे खेळाडू प्रत्येक गटाच्या टॉप फाइव्हमध्ये असत. त्यामुळे या तगड्या खेळाडूंपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागणे शक्य नव्हते. तरीही भारताच्या महिलांनी जोरदार प्रयत्न केले.
ज्युनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात टॉप फाइव्हमध्ये भारताच्या तीन खेळाडू होत्या, तरीही गटाचे विजेतेपद मंगोलियाच्या मुंगुनशगाई हिने पटकाविले. भारताच्या सोलिमला जाजोला रौप्य तर भाविका प्रधानला कांस्य मिळाले. चौथा क्रमांकही भारताच्याच सोलन जाजोने मिळविला.
सिनियर महिलांच्या १५५ से.मी. उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारताला चौथे पदक मिळाले. या गटातही मंगोलियाची बदामखंड पहिली आणि थायलंडची किरीटिया चंतारत दुसरी आली. डॉ. मंजिरी भावसारने या गटात कांस्य जिंकून आपल्या पदकांची यादी आणखी वाढविली. या गटात मुंबईची निशरीन पारीख पाचवी आली. भारताच्या गीता सैनीने मात्र निराशा केली. ती अव्वल पाच खेळाडूंमध्येही स्थान मिळवू शकली नाही.