क्रीडा

माटुंग्याची डॉन बॉस्को शाळा मुंबईत अव्वल!

बोरिवलीची डॉ. स‌र्वपल्ली राधाकृष्णन शाळा दुसऱ्या क्रमांकावर; नोरा अल्वा, मीहान चंदिरमाणी स्पर्धेतील स‌र्वोत्तम क्रीडापटू

ऋषिकेश बामणे

मुंबई : माटुंग्याच्या डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलने एसएफए अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत अव्वल क्रमांकाची शाळा ठरताना सर्वसाधारण जेतेपद मिळवले. बोरिवलीच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रोज मनोर आंतरराष्ट्रीय शाळेच्या नोरा अल्वाला स्पर्धेतील सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा ‘गोल्डन गर्ल’ हा पुरस्कार बहाल करण्यात आला. मुलांमध्ये गुंदेचा एज्युकेशन अकादमीच्या मीहान चंदिरमाणीने ‘गोल्डन बॉय’चा किताब पटकावला. याबरोबरच स्पर्धची दिमाखात सांगता झाली.

२६ नोव्हेंबरपासून संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणांवर रंगलेल्या एसएफए क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या हंगामात ८०० शाळांतील १७ हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले. एकंदर ३० क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या सहभागाचे प्रमाण ६४, तर मुलींच्या सहभागाचे प्रमाण ३६ टक्के होते. यंदा एसएफए स्पर्धांमध्ये प्रथमच जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, स्पीडक्युबिंग हे खेळ सहभागी करण्यात आले. त्याशिवाय फुटबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, जलतरण, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश होता. क्रिकेट सोडून अन्य खेळांना प्रोत्साहन देण्याचाही या स्पर्धेचा हेतू होता. मुंबईनंतर पुढील चार महिन्यांत पुणे, नागपूर, बंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, जयपूर, उत्तराखंड अशा शहरांमध्ये या स्पर्धेचे वारे वाहणार असून यामुळे देशाला भविष्यातील तारे शोधण्यास हातभार लागेल.

माटुंग्याच्या डॉन बॉस्को स्कूलने स्पर्धेत सर्वाधिक २३९ गुण कमावले. ज‌वळपास दोन आठवडे रंगलेल्या या स्पर्धेत त्यांनी १० सुवर्ण, १५ रौप्य, २२ कांस्यपदकांची कमाई केली. बोरिवलीच्या राधाकृष्णन विद्यालयाने २३० गुणांसह दुसरे, तर गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलने २२८ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले. गोल्डन गर्ल ठरलेल्या नोराने ९ वर्षांखालील गटात स्केटिंग व अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक काबिज केले. गोल्डन बॉय ठरलेल्या मीहानने ८ वर्षांखालील गटात ज्युडो व स्पीडक्युबिंगमध्ये २ सुवर्ण व २ रौप्यपदकांवर नाव कोरले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी