कॅरोलिन गर्सिया आणि कॅस्पर रूड यांनी सुरुवातीपासून अखेरपर्यंत वर्चस्व राखत सरळ सेटमध्ये विजय मिळवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला; परंतु २३वा मानांकित निक किर्गियोस पराभूत झाल्याने स्पर्धेच्या बाहेर गेला.
फ्रांसच्या गर्सियाने आर्थर ऐस स्टेडियममध्ये अमेरिकेच्या कोको गॉफला ६-३, ६-४ ने पराभूत केले. गर्सिया प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम टूर्नामेंटच्या अंतिम चारमध्ये पोहोचली. गर्सिया २०१८मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचली होती; परंतु त्यानंतर तिला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. गेल्या सत्रात ती ७४व्या स्थानावर गेली. पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या क्रमवारीत ती टॉप टेनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
अमेरिकी ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आता गर्सियाला ट्यूनिशियाची विम्बल्डन उपविजेती ओंस जाबूर हिला नमवावे लागेल. जाबूरने तिसऱ्या फेरीत सेरेना विलियम्सला नमविणाऱ्या अजला टॉमलजानोविच हिला ६-४, ७-६ (४) असे पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली.
पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत नार्वेचा पाचवा मानांकित रूडने तेरावा मानांकित माटेओ बेरेटिनी याला सरळ सेटमध्ये ६-१, ६-४, ७-६ (४) असे नमविले. आता त्याचा मुकाबला २७वा मानांकित करेन खाचानोव याच्याशी होईल. रशियन खेळाडू खाचानोव याने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या किर्गियोसला पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत ७-५, ४-६, ७-५, ६-७ (३), ६-४ असे नमविले. हा सामना साडेतीन तास रंगला.