(Photo-X/BCCI)
क्रीडा

सर्व प्रश्नांची उत्तरे कामगिरीतून देऊ! श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय प्रशिक्षक गंभीर यांचे रोखठोक मत

भारतीय कसोटी संघाची अलीकडच्या काळातील घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नसली, तरी १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे.

Swapnil S

कोलंबो : भारतीय कसोटी संघाची अलीकडच्या काळातील घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी प्रभावी राहिलेली नसली, तरी १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे. सर्व प्रश्नांची आम्ही कामगिरीद्वारेच उत्तर देऊ, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ठामपणे व्यक्त केला.

२०२४च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या ४४ वर्षीय गंभीरच्या कार्यकाळात भारताची कसोटीतील कामगिरी सुमार राहिली आहे. भारताने एकीकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, तर २०२६मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र कसोटीत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला मायदेशातच दारुण पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका गमावली. इंग्लंडविरुद्ध भारताने जेमतेम २-२ अशी बरोबरी साधली. आता अनेक अनुभवी खेळाडू निवृत्त झालेले असताना भारतीय संघ २०२७ या वर्षात प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप-डब्ल्यूटीसी) सामना खेळणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये कसोटी सामना खेळला होता. मात्र ती लढत डब्ल्यूटीसीचा भाग नव्हती. त्यामुळे २०२७च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी पात्र ठरायचे असल्यास भारताला उर्वरित ९ कसोटींमध्ये कामगिरी उंचवावी लागेल.

सराव सत्रापूर्वी संघाला संबोधित करताना गंभीर यांनी सर्व खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याचे आवाहन केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये गंभीर म्हणाले की, “आपल्यासमोर काय आव्हान आहे आणि आपण कशासाठी खेळत आहोत याची पूर्ण कल्पना सर्वांना आहे. १५ ऑगस्टच्या सकाळी आपण प्रथम फलंदाजी करू किंवा गोलंदाजी, प्रतिस्पर्ध्यांनी फेकलेल्या प्रत्येक प्रश्नाचे चोख उत्तर देण्यासाठी आपण मैदानात तयार असलो पाहिजे. त्यामुळे आतापासूनच प्रत्येक आघाडीवर तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे.”

या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे, तर दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ०-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय संघाची ही पहिलीच मालिका असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात फिरकी अष्टपैलू सारांश जैन आणि वेगवान गोलंदाज आकिब नबी या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ३३ वर्षीय सारांश जैनचे गंभीर यांनी अभिनंदन केले.

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी संघात स्थान मिळालेल्या नबीने गेल्या रणजी हंगामात जम्मू-काश्मीरला विजेतेपद मिळवून देण्यात बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करत दोन्ही खेळाडूंना देश व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

डब्ल्यूटीसीमध्ये भारताची सद्यस्थिती कशी?

  • जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताने ९ पैकी ४ कसोटी जिंकल्या आहेत, तर ४ कसोटींत त्यांचा पराभव झाला आहे. १ लढत अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ५२ गुण असून त्यांची टक्केवारी ४८.१५ इतकी आहे.

  • डब्ल्यूटीसीमध्ये टक्केवारीनुसार संघांची क्रमवारी ठरवली जाते. ऑस्ट्रेलिया ८७.५० टक्क्यांसह अग्रस्थानी आहे, तर दक्षिण आफ्रिका ७५ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे न्यूझीलंड (७२.२२%) आणि बांगलादेश (५८.३३%) यांचा क्रमांक लागतो.

  • भारताचे आता २०२५-२७च्या डब्ल्यूटीसी मालिकेतील ९ कसोटी सामने अद्याप शिल्लक आहेत. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ प्रत्येकी २ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर जानेवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ ५ कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येईल.

  • भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरता ९ पैकी किमान ७ कसोटी जिंकणे व १ अनिर्णित लढत हे समीकरण परवडू आहे. तसेच ते फक्त एकच पराभूव स्वीकारू शकतात. याव्यतिरिक्त, अव्वल दोन क्रमांकाच्या संघांचीही कामगिरी ढासळणे गरजेचे आहे.

  • भारताने यापूर्वी २०२१ व २०२३च्या डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीदेखील गाठता आली नव्हती. त्यामुळे २०२७साठी भारताकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत.

भारताने गेल्या १८ वर्षांत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली नाही. २००८मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध अखेरची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने ५ वेळा त्यांना कसोटी मालिकेत धूळ चारली, तर २०१०ची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.

भारत ४ वर्षांनी प्रथमच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. २०२२मध्ये उभय संघांत भारतात अखेरची कसोटी मालिका झाली होती. त्यावेळी भारताने २-० असे यश संपादन केले होते. तसेच २०१७नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार अर्ज १७ ऑगस्टपर्यंत भरा! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी

Thane : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी