क्रीडा

दुहेरी भूमिका बजावण्यासाठी गिरीश सज्ज!

ऋषिकेश बामणे

मुंबई : कल्याणमध्ये जन्मलेला डिफेंडर (कोपरारक्षक) गिरीश इरनक आगामी प्रो कबड्डी लीगमध्ये त्याच्या घरचा संघ म्हणजेच यू मुंबासाठी दुहेरी भूमिका बजावण्यास सज्ज आहे. ३२ वर्षीय गिरीश प्रथमच प्रो कबड्डीत मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. तसेच या हंगामासाठी अनुभवी गिरीशवर स्थानिक खेळाडू असल्या कारणाने ‘स्पिरीट ऑफ मुंबा कॅप्टन’ची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.

२ डिसेंबरपासून अहमदाबाद येथे प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईत मंगळवारी झालेल्या जर्सी अनावरण कार्यक्रमाच्या वेळी गिरीशने या भूमिकेबाबत तसेच घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी आपण आतुर असल्याचे सांगितले. यू मुंबाने १०व्या हंगामासाठी १ कर्णधार, २ उपकर्णधारांची नेमणूक केली आहे. त्याव्यतिरिक्त गिरीश अनुभवी असल्याने त्यालाही जणू एकप्रकारे कर्णधाराइतकेच महत्त्व देण्यात आलेले आहे.

“संघाला माझ्याकडून यंदा फार अपेक्षा आहेत. त्यामुळेच मला ‘स्पिरीट ऑफ मुंबा कॅप्टन’ची जबाबदारी देण्यात आली आहे. संघातील प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. त्यामुळे कधी कर्णधार आणि उपकर्णधार मॅटवर नसतील, तर अशा वेळी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास, शिस्त राखण्यास मी पुढाकार घेईन. तसेच मैदानाबाहेरही संघातील वातावरण उत्तम राखण्यावर माझा भर असेल,” असे गिरीश म्हणाला. गिरीशने यापूर्वी बंगाल वॉरियर्स, पाटणा पायरेट्स, पुणेरी पलटण या संघांचेही प्रतिनिधित्व केलेले आहे. तसेच यू मुंबाच्या सध्याच्या संघात प्रो कबड्डीचे सर्व ९ हंगाम खेळलेला गिरीश हा एकमेव खेळाडू आहे.

“यू मुंबाने पहिल्या तीन हंगामांत चमकदार कामगिरी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. यंदा आम्हीही तशीच कामगिरी करू. तसेच मी कल्याणचा राहणारा असल्याने यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना उत्साह वाढलेला असेल. संघातील काही खेळाडू ७ ते ८ हंगाम खेळलेले आहेत. त्यांनाही पुरेसा अनुभव आहे. या सर्व बाबींचा आम्ही पूरेपूर फायदा करून घेऊ,” असेही गिरीशने अखेरीस नमूद केले.

सुरिंदर सिंग यू मुंबाचा कर्णधार

बॉलीवूड अभिनेती विकी कौशल, संघमालक रॉनी स्क्रूवाला आणि सीईओ सुहेल चंधोक यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीकेसी येथे बुधवारी यु मुंबा संघाचा जर्सी अनावरण सोहळा पार पडला. यावेळीच प्रो कबड्डीच्या १०व्या हंगामासाठी पुन्हा एकदा सुरिंदर सिंगची यू मुंबाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. रिंकू शर्मा आणि महेंदर सिंग यांची संयुक्तपणे उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय कल्याणच्या गिरीश इरनकला ‘स्पिरीट ऑफ मुंबा कॅप्टन’ची जबाबदारी देण्यात आली. यावेळी गिरीशसह सुरिंदर, महेंदर, गुमान सिंग आणि प्रणय राणे हे यू मुंबाचे खेळाडूही उपस्थित होते.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!