क्रीडा

शासनाने परवानगी नाकारल्यास बीसीसीआयने लेखी पुरावा द्यावा; भारताच्या भूमिकेविषयी PCB चे स्पष्ट मत

पुढील वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार असून भारत-पाकिस्तान यांच्यात १ मार्च रोजी लढत होणे अपेक्षित आहे.

Swapnil S

लाहोर : भारतीय संघाने २०२५च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी न होण्याचे काहीच कारण नाही. मात्र शासनाने त्यांना परवानगी नाकारल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यासंबंधीचा लेखी पुरावा आमच्याकडे सादर करावा, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मांडले आहे.

पुढील वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार असून भारत-पाकिस्तान यांच्यात १ मार्च रोजी लढत होणे अपेक्षित आहे. भारताचे सर्व सामने लाहोर येथे होणार असून त्यांचे हॉटेलही स्टेडियमपासून ५ ते १० मिनिटांच्या अंतरावरच असेल. मात्र बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेत सहभागी होण्याविषयी निर्णय घेतलेला नाही. तसेच केंद्र शासन भारतीय संघाच्या समावेशाचा निर्णय घेईल, असेही बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले होते. बिघडलेले राजकीय संबंध तसेच खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यावर आता पीसीबीने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“जर केंद्र शासनाने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी नाकारली, तर ती लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. तसेच बीसीसीआयने आयसीसीला तसे पत्र देणे बंधनकारक असेल. बीसीसीआयने आयसीसीला त्यांच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील समावेशाबाबत किमान ५ ते ६ महिने आधी कळवावे,” असे पीसीबीचा पदाधिकारी म्हणाला.

यापूर्वी २०२३मध्ये पाकिस्तानात आशिया चषक खेळवण्यात येणार होता. मात्र भारताने तेथे जाण्यास नकार दिल्याने हायब्रिड मॉडेल म्हणजेच संमिश्र स्वरूपात ही स्पर्धा खेळवण्यात आले. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. तसेच उपांत्य व अंतिम सामनाही श्रीलंकेतच झाला. तसाच पर्याय यंदाही भारतीय संघ अवलंबू शकतो. जर भारताने चॅम्पियन्स करंडकातून माघार घेतली, तर श्रीलंका या स्पर्धेसाठी पात्र ठरेल.

हायब्रिड मॉडेल म्हणजे काय?

- हायब्रिड मॉडेलनुसार एखादी आयसीसी किंवा प्रतिष्ठेची स्पर्धा दोन देशांत खेळवता येऊ शकते.

- यामध्ये काही संघ त्यांचे सामने ठरावीक ठिकाणीच खेळतात. जसे भारतीय संघ २०२३च्या आशिया चषकात सर्व सामने श्रीलंकेतील कँडी आणि कोलंबो येथे खेळला.

- आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीसुद्धा श्रीलंकेसह दुबई, अबुधाबी येथे सामने खेळवण्याचा पर्याय आयसीसीपुढे उपलब्ध आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी