क्रीडा

वन-डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात हार्दिक पंड्याने टिपले चार बळी,आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

वृत्तसंस्था

वन-डे मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात रविवारी भारताने इंग्लंडचा डाव ४५.५ षट्कांत २५९ धावांत संपुष्टात आणला. त्यामुळे भारताला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी २६० धावांचे आव्हान मिळाले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा (८० चेंडूंत ६०) केल्या. बटलरने वन-डे कारकीर्दीतील २२वे अर्धशतक झळकाविले. भारताकडून हार्दिक पांड्याने चार विकेट्स घेतल्या. झटपट धावा काढण्याच्या प्रयत्नात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने चार बळी टिपले. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने दोन आणि युजवेंद्र चहलने तीन विकेट्स घेतल्या.

या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला. पहिल्या सामन्यात सहा विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सलामीवीर जेसन रॉयने पहिल्याच षट्कात तीन चौकार लगावत आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षट्कात इंग्लंडने एकही विकेट न गमावता १२ धावा केल्या. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षट्कातील तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बदली खेळाडू श्रेयस अय्यरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. बेअरस्टो खाते न उघडताच बाद झाला.

सिराजने याच षट्कातील शेवटच्या चेंडूवर त्याने जो रूटला स्लिपमध्ये रोहित शर्माच्या हाती सोपविले. रूटलाही भोपळा फोडता आला नाही.

जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांनी धावगतीचे भान राखत आठव्या षट्कात संघाचे अर्धशतक फलकावर लावले. दहाव्या षट्कात हार्दिक पंड्याने जेसन रॉयला (३१ चेंडूंत ४१) ऋषभ पंतमार्फत झेलबाद केले.

हार्दिकने त्याच्या तिसऱ्या षट्कात स्टोक्सला (२९ चेंडूंत २७) झेल स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपून दुसरा विकेट मिळवला. १३. २ षट्कांत इंग्लंडची अवस्था ४ बाद ७४ अशी झाली.

२८व्या षट्कात रवींद्र जडेजाने मोईन अलीला (४४ चेंडूंत ३४) पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. मोईन आणि जोस बटलर यांनी ८४ चेंडूत ७५ धावांची भागीदारी केली. बटलरने वन-डे कारकीर्दीतील २२ वे अर्धशतक ६५ चेंडूत झळकविले.

लियाम लिव्हिंगस्टोन (३१ चेंडूंत २७) हार्दिकचा तिसरा बळी ठरला. हार्दिकने एकाच षट्कात लियाम लिव्हिंगस्टोन आणि कर्णधार जोस बटलर (८० चेंडूंत ६०) यांना बाद केले. हार्दिकने चार विकेट्स घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी बजावली.

४४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर डेव्हिड विली (१५ चेंडूंत १८) चहलच्या गोलंदाजीवर यादवच्या हाती झेल देत बाद झाला. मग युजवेंद्र चहलने एकाच षट्कात दोन विकेट घेतल्या. ४५व्या षट्काच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने क्रेग ओव्हरटनला आणि पाचव्या चेंडूवर रीस टॉपलीला बाद केले. इंग्लंडचा डाव ४५.५ षट्कांत २५९ धावांत संपुष्टात आला.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम