माऊंट माँगानुइ : न्यूझीलंड संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व प्रथमच करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फलंदाज म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. दुसरीकडे, भारतीय आणि न्यूझीलंडचे संघ आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देत नव्या समीकरणांसह मैदानात उतरणार आहेत. शुक्रवारचा सामना माऊंट माँगानुइ येथे खेळविण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे. न्यूझीलंडला मालिका वाचवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर येथे भारताच्या न्यूझीलंडवारीला प्रारंभ झाला होता. २२ ऑक्टोबरपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने टी-२० मालिकेत ३-२ अशी बाजी मारली. या दौऱ्यात ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा देखील समावेश आहे. आता टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेचा थरार सुरू आहे. त्यामुळे एकीकडे भारतातील चाहते दिवाळी साजरी करत असतानाच त्यांचे न्यूझीलंडमध्येही लक्ष लागून आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कारकीर्दीतील हा अखेरचा न्यूझीलंड दौरा ठरू शकतो.
दरम्यान, भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असली, तरी न्यूझीलंडमधील वेगवान गोलंदाजांना अनुकूल वातावरण भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. पहिल्या लढतीत विराटचे अर्धशतक व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर भारताने बाजी मारली, तर दुसऱ्या लढतीत गुर्नूर ब्रारने कमाल केली. फलंदाजीत भारताची नक्कीच काहीशी भंबेरी उडाली होती. मात्र डकवर्थ लुईस नियमाने भारताला तारले. तिसरा सामना पावसामुळे पूर्ण रद्द झाला.
शुभमन गिल कसोटी मालिकेच्या तयारीसाठी संघातून बाहेर पडला असून, उर्वरित दोन सामन्यांत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अय्यरला या मालिकेत आखूड चेंडूंविरुद्ध खेळताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कर्णधारपदाच्या पदार्पणात फलंदाजी सुधारण्याचेही त्याचे लक्ष्य असेल. एकूणच अय्यरचा दुहेरी कस लागणार आहे.
रोहितने न्यूझीलंडमध्ये १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र त्याला येथे एकही शतक साकारता आलेले नाही. १४ डावांत रोहितची सरासरी ४० पेक्षाही कमी आहे. त्यामुळे रोहितवर दडपण असेल.
भारताने बे-ओव्हल येथे तीनपैकी दोन एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तसेच येथे गेल्या चार लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. लढतीवर पावसाचे सावट नसल्याने चाहत्यांना पूर्ण खेळाचा आस्वाद लुटता येईल. खेळपट्टीविषयी मात्र संभ्रम कायम आहे. अशा स्थितीत भारतीय संघ कोणते ११ खेळाडू निवडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
किवी संघाच्या फलंदाजांची कसोटी
न्यूझीलंडचे टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ आणि हेन्री निकोल्स हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी वन-डे संघातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. अनकॅप्ड ब्रेट रँडेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडने मायदेशात अखेरची वन-डे मालिका सात वर्षांपूर्वी भारताविरुद्ध गमावली होती. त्यामुळे शुक्रवारी होणारा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघ मात्र अय्यरच्या नेतृत्वाखाली मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उत्सुक असेल.
तिलक आणि ऋ तुराजपैकी एकाला संधी
रोहित व श्रेयस यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. दोघांनीही दोन लढतींमध्ये फारशी चमक दाखवलेली नाही.
तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी कुणाला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. दुखापतीमुळे टी-२० मालिकेतील बहुतांश सामने मुकलेल्या इशान किशनला आता संधी मिळण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी त्याने सलामीला खेळताना द्विशतक झळकावले होते.
के. एल. राहुल संघाबाहेर असल्याने यष्टिरक्षणाची जबाबदारीही त्याच्याकडे येऊ शकते. ऋतुराज गायकवाडने मागील चार वन-डे डावांत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे मधल्या फळीत त्याला संधी मिळाल्यास मोठी खेळी करण्याची अपेक्षा असेल.
गुर्नूर, कंबोजसह वेगवान चौकडी लयीत
भारतीय वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. आकिब नबी, गुर्नूर ब्रार, अंशुल कंबोज आणि अर्शदीप सिंग यांनी सातत्याने विकेट मिळवत आपली छाप पाडली आहे. पहिल्या लढतीत कंबोज सामनावीर ठरला, तर दुसऱ्या सामन्यात ब्रारने ४ बळी मिळवून हा पुरस्कार पटकावला. दोन्ही सामन्यांत भारताने न्यूझीलंडला २०० धावांच्या आत गारद केले. तसेच दोन्ही लढतींमध्ये भारतानेच नाणेफेक जिंकली, हे विशेष. आगामी कसोटी सामना अवघ्या १० दिवसांवर असल्याने मोहम्मद सिराजला या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. अशा स्थितीत नबीला संघातून वगळले जाईल, असे दिसते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुर्नूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, मॅट हेन्री, कायले जेमिसन, टॉम लॅथम, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, नॅथन स्मिथ, ब्लेर टिकनर, विल यंग.
वेळ : सकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप