क्रीडा

IND vs NZ ODI : रोहित केले अनेक विक्रम ; भारताचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव करून मालिका ३ - ० ने जिंकली

प्रतिनिधी

तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने जिंकली. भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. विजयासाठी ३८६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव ४१.२ षटकांत २९५ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर डेव्हान कॉन्वे (१०० चेंडूंत १३८) आणि हेन्री निकोलस (४० चेंडूंत ४२) यांनी कडवी झुंज दिली. परंतु अन्य फलंदाज विशिष्ट अंतराने बाद होत राहिल्याने क्लीनस्वीप टाळण्यात किवीजना अपयश आले. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.

युझवेंद्र चहलने दोन विकेट्स मिळविल्या. हार्दिक पंड्या आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली. त्याआधी, रोहित शर्मा (८५ चेंडूंत १०१) आणि शुभमन गिल (७८ चेंडूंत ११२) यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ९ बाद ३८५ धावा केल्या. या दोघांनी भारताला २१२ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. अखेर हार्दिक पांड्याने स्लॉग ओव्हरमध्ये (३८ चेंडूंत ५४) आक्रमक खेळी करून धावसंख्या वाढविली.

रोहितने केली रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

कर्णधार रोहित शर्माने ८३ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने तीन वर्षानंतर वन-डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. या शतकासह त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. रोहित आणि पाँटिंग या दोघांनी वन-डेमध्ये ३० शतके झळकाविली आहेत.

सर्वाधिक षटकार मारणारा जगातील तिसरा फलंदाज

हिटमॅन रोहित शर्माने तिसरा षटकार मारताच तो भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. रोहितचे आता वन-डेमध्ये २७३ षटकार झाले आहेत. त्याच्यापुढे ख्रिस गेल (३३१) आणि शाहिद आफ्रिदी (३५१) हे दोन फलंदाज आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाला धडाक्यात सुरुवात केली. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शुभमनने लॉकी फर्ग्युसनला चौकार मारून भारताचे अर्धशतक झळकविले. पहिल्या १० षटकांतच भारताच्या बिनबाद ८२ धावा झाल्या. या दोघांनी २१२ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित शर्मा शतक पूर्ण झाल्यानंतर लगेच बाद झाला. मायकल ब्रेसवेलने त्याला त्रिफळाचीत केले. ८५ चेंडूंत १०१ धावा करताना त्याने सहा षटकार आणि नऊ चौकार लगावले.

रोहित शर्मानंतर शुभमन गिलही आपले शतक पूर्ण केल्यानंतर बाद झाला. टिकनरच्या गोलंदाजीवर कॉन्वेने त्याचा झेल टिपला. गिलचे वन-डे कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. ७८ चेंडूंत ११२ धावा करताना त्याने पाच षटकार आणि १३ चौकार लगावले. त्याने ८४ चेंडूंत शतक झळकविले. एक चौकार आणि एक षटकार ठोकत लयीत आलेला इशान किशन (२४ चेंडूंत १७) पस्तीसाव्या षटकात धावबाद झाला. विराट कोहली (२७ चेंडूंत ३६) बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही (९ चेंडूंत १४) लगेच बाद झाला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?