Photo : X (@TheHockeyIndia)
क्रीडा

आशियाई जेतेपदासह भारत विश्वचषकास पात्र; अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर ४-१ ने वर्चस्व

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील शिलेदारांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवून पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याचा मान मिळवला.

Swapnil S

राजगिर (बिहार) : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील शिलेदारांनी रविवारी ऐतिहासिक कामगिरी केली. आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ४-१ असा धुव्वा उडवून पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याचा मान मिळवला. भारताने २०१७ नंतर प्रथमच, तर एकंदर चौथ्यांदा आशिया चषक उंचावला.

भारतीय हॉकी महासंघातर्फे २९ ऑगस्टपासून बिहार येथील राजगिर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. हॉकीच्या आशिया चषकाचे हे १२वे पर्व असून भारत २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत होता. भारताने यापूर्वी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली होती, तर दक्षिण कोरियाने सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवले आहे. क्रेग फुल्टन हे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. २०२६मध्ये नेदरलँड्स व बेल्जियम येथे पुरुषांचा हॉकी विश्वचषक रंगणार असून भारत त्यासाठी थेट पात्र ठरला आहे.

या स्पर्धेत ८ संघांचा समावेश होता. त्यापैकी भारताने अ-गटात सलग तीन सामने जिंकून थाटात सुपर-फोर फेरी गाठली. तसेच चीन, कोरिया व मलेशिया यांनीही आगेकूच केली. मग सुपर-फोर फेरीत भारताने कोरियाला बरोबरीत रोखले, तर मलेशिया व चीन यांना धूळ चारली.

मग रविवारी झालेल्या अंतिम सामन्यातसुद्धा भारताने पहिल्या मिनिटापासूनच कोरियावर वर्चस्व गाजवले. सुखजीत सिंगने पहिल्याच मिनिटाला अफलातून गोल केला. दिलप्रीत सिंगने २८व्या मिनिटाला भारताची आघाडी २-० अशी वाढवली. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ ही आघाडी टिकवून होता.

मग तिसऱ्या सत्रातही भारताने चमकदार कामगिरी केली. दिलप्रीतने ४५व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा गोल केला, तर अमित रोहिदासने ५०व्या मिनिटाला चौथा गोल झळकावत संघाचा विजय पक्का केला. ५१व्या मिनिटाला कोरियाच्या सन डेनने एकमेव गोल केला. मात्र उर्वरित वेळेत त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे भारताने गतविजेत्यांना नमवून थाटात जेतेपद पटकावले. अभिषेक नैनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

भारतासाठी हरमनप्रीत, सुखजीत व अभिषेक नैन यांनी या स्पर्धेत प्रत्येकी ६ गोल केले. भारताने या स्पर्धेत एकंदर ९ सामन्यांत एकूण ३९ गोल नोंदवले.

भारताने २००३, २००७, २०१७ व २०२५ या चार वर्षी आशिया चषकाचे जेतेपद मिळवले.

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका