Photo : X (@BCCIWomen)
क्रीडा

India-Australia Women’s ODI Series : स्मृतीच्या शतकामुळे महिलांची मालिकेत बरोबरी

स्मृती मानधनाने ९१ चेंडूंत साकारलेल्या ११७ धावांच्या तुफानी खेळीला गोलंदाजांच्या कामगिरीची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला १०२ धावांनी धूळ चारली. याबरोबरच भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

Swapnil S

मुल्लानपूर : स्मृती मानधनाने ९१ चेंडूंत साकारलेल्या ११७ धावांच्या तुफानी खेळीला गोलंदाजांच्या कामगिरीची योग्य साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला १०२ धावांनी धूळ चारली. याबरोबरच भारताने तीन लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. ३० सप्टेंबरपासून भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या निमित्ताने या मालिकेतील कामगिरी भारताच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताचे २८२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. त्यातच मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज तापामुळे उर्वरित मालिकेला मुकणार आहे.

दरम्यान, बुधवारी प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.५ षटकांत २९२ धावांपर्यंत मजल मारली. स्मृतीने १४ चौकार व ४ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील १२वे शतक साकारले. प्रतिका रावल (२५), दीप्ती शर्मा (४०), रिचा घोष (२९) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे भारताचा संघ ५० षटके पूर्ण होण्यापूर्वीच गारद झाला. कांगारूंसाठी डार्सी ब्राऊनने तीन बळी मिळवले. कर्णधार हरमनप्रीत कौर फक्त १७ धावा करून बाद झाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेगवान गोलंदाज क्रांती गौड (२८ धावांत ३ बळी) हिच्या माऱ्यापुढे कांगारूंचा संघ ढेपाळला. भारताने ऑस्ट्रेलियाला ४०.५ षटकांत १९० धावांत गारद केले. सदरलँड (४५) व एलिस पेरी (४४) यांनी झुंज दिली. मात्र कर्णधार एलिसा हीली (९), गार्डनर (१७), जॉर्जिया वॉल (०), बेथ मूनी (१८) अपयशी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले. स्मृती सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. आता शनिवार, २० सप्टेंबर रोजी तिसरी लढत खेळवण्यात येईल. त्याद्वारे मालिकेचा निकाल लागेल.

भारताने २००७ म्हणजेच तब्बल १८ वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मायदेशात एखादा एकदिवसीय सामना जिंकला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ४९.५ सर्व बाद २९२ (स्मृती मानधना ११७, दीप्ती शर्मा ४०; डार्सी ब्राऊन ३/४२) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : ४०.५ षटकांत सर्व बाद १९२ (सदरलँड ४५, एलिस पेरी ४४; क्रांती गौड ३/२८)

  • सामनावीर : स्मृती मानधना

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर