दुबई : आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील थरार आता आणखी वाढणार आहे. शनिवारपासून या स्पर्धेतील सुपर-फोर फेरीला प्रारंभ होणार असून रविवारी चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. शनिवारी श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील सामन्याद्वारे सुपर-फोर फेरी सुरू होईल.
यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात, तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ होते. भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली, तर पाकिस्तानने दुसरे स्थान मिळवले. दुसरीकडे, श्रीलंकेने ब-गटात सलग तीन लढती जिंकून पहिला क्रमांक मिळवला, तर बांगलादेशने दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे त्यांनीही सुपर-फोर फेरी गाठली.
नियमानुसार रविवार, २१ सप्टेंबरला अ-गटातील आघाडीचे दोन संघ पुन्हा एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान दुबईच्या रणांगणात पुन्हा एकदा आमनेसामने येतील. उभय संघांतील साखळी लढतीत भारताने पाकिस्तानला ७ गडी व २५ चेंडू राखून सहज धूळ चारली. त्या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा मैदानातील अन्य कृतींनी लक्ष वेधले होते.
साखळी सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीशी हातमिळवणी केली नाही. तसेच विजयी फटका लगावल्यानंतरही सूर्यकुमार शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने परतला. या दोघांनी पंचांसह पाकिस्तान खेळाडूंशीही हस्तांदोलन केले नाही. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानचे खेळाडू सीमारेषेजवळ येत असतानाच भारताचे सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले व एका सदस्याने दरवाजासुद्धा बंद केला. या सर्व प्रकरणात मग सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली. मात्र ही मागणी आयसीसीने फेटाळल्यावर पाकिस्तानने यूएईविरुद्धची लढत न खेळण्याची धमकी दिली. अखेर पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचे पीसीबीने सांगितले व सामना एक तास उशिराने सुरू झाला.
दरम्यान, भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी सर्व सामने अमिरातीतील दुबई व अबुधाबी येथे होतील. गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडले असून याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अनेक नागरिकांचा बळी गेला. त्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशीही मागणी काहींनी केली होती. मात्र आशिया चषक तसेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान लढती होत राहतील. फक्त या लढती भारत किंवा पाकिस्तानात होणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे.
२०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीशी केलेल्या करारानुसार पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. तसेच भारतही कोणत्याही सामन्यासाठी पाकिस्तानात जात नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळला. तसेच आता संपूर्ण स्पर्धा अमिरातीत होणार आहे. २०२७ पर्यंत हा करार कायम असेल. एकूणच आता रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा होणाऱ्या सामन्यात भारताचे खेळाडू कोणती भूमिका अवलंबणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात
डार्क हॉर्स म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. त्यांना गुरुवारी अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ८ बाद १६९ धावा केल्या. मोहम्मद नबीने २२ चेंडूंत ६० धावा फटकावल्या. मात्र कुशल मेंडिसच्या ५२ चेंडूंतील नाबाद ७४ धावांमुळे श्रीलंकेने १८.४ षटकांत विजय मिळवला. त्यामुळे श्रीलंकेने गटात ६ गुणांसह अग्रस्थान मिळवले, तर बांगलादेश ४ गुणांसह दुसरे स्थान मिळवून सुपर-फोर फेरीत दाखल झाला. अफगाणिस्तानने फक्त हाँगकाँगविरुद्धच्या विजयाचे २ गुण मिळवले. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वेल्लालागे मायदेशी परतला
श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. सामना संपल्यानंतर प्रशिक्षक जयसूर्या व संघ व्यवस्थापक यांनी वेल्लालागेला याविषयी माहिती दिली. त्यामुळे तो त्वरितच मायदेशी परतला. वेल्लालागे उर्वरित आशिया चषकात सहभागी होईल की नाही, याविषयी संभ्रम आहे. वेल्लालागेच्या वडिलांचे निधन नेमका सामना सुरू होण्यापूर्वी झाले की सामना सुरू असताना, हे अद्याप समजलेले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध २०व्या षटकात नबीने वेल्लालागेच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार लगावले.