कोलंबो : फिरकीपटू स्नेह राणा आणि श्री चरनी यांनी अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेच्या महिला संघाला अवघ्या १४७ धावांवर रोखले. त्यानंतर प्रतिका रावलने नाबाद अर्धशतक झळकावत तिरंगी एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात रविवारी भारताला ९ विकेट राखून सोपा विजय मिळवून दिला.
नाणेफेकीचा कौल जिंकत भारतीय महिला संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राणा (३/३१) आणि चरनी (२/२६) या दुकलीने ५ विकेट घेत ३९ षटकांत श्रीलंकेला १४७ धावांवर सर्वबाद करण्यात मोलाचे योगदान दिले. फिरकीपटू दीप्ति शर्माने (२/२२) त्यांना चांगली साथ दिली.
स्मृती मानधनाने (४३ धावा) भारतीय महिला संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रावल (नाबाद ५० धावा) आणि हर्लिन देओल (नाबाद ४८ धावा) यांनी २९.४ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ पुढचा सामना २९ एप्रिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
रावलने आपला फॉर्म कायम राखला आहे. आयर्लंडविरुद्ध तिने शानदार खेळी खेळली होती. रविवारी तिने आपल्या कारकिर्दीचा सातवा एकदिवसीय सामना खेळला. २४ वर्षीय खेळाडून तिच्या पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. रावलने या सामन्यात दोन अप्रतिम भागिदारी केल्या. सलामीला फलंदाजीला आलेल्या या खेळाडूने मानधनासोबत ५९ चेंडूंत ५४ धावांची भागिदारी केली. त्यानंतर देओलसोबत नाबाद ९५ धावांची भागिदारी केली.
गोलंदाजांचे आक्रमण
भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांच्या आक्रमणात यजमान श्रीलंकेचा संघ भुईसपाट झाला. फिरकीपटू स्नेह राणा आणि श्री चरनी यांनी ५ फलंदाजांना माघारी धाडले. दीप्ति शर्मानेही २ फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला. या तिकडीने ७ फलंदाजांना बाद केल्याने यजमानांच्या फलंदाजीतील हवाच निघून गेली.