Hockey India
क्रीडा

विक्रमी 'पंच' अन् पुन्हा एकदा चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाला पाचव्यांदा आशियाई जेतेपद

Asian Champions Trophy Hockey Tournament: भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियात त्यांचीच सत्ता असल्याचे पुन्हा दाखवून दिले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान चीनला १-० असे नमवून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद काबिज केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियात त्यांचीच सत्ता असल्याचे पुन्हा दाखवून दिले. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान चीनला १-० असे नमवून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद काबिज केले. भारताने सलग दुसऱ्यांदा चषक उंचावण्याचा पराक्रम केला, हे विशेष.

चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत गतविजेत्या भारतालाच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. यंदा या स्पर्धेचे आठवे पर्व होते. त्यांपैकी भारताने सर्वाधिक पाच वेळा (२०११, २०१६, २०१८, २०२३, २०२४) ही स्पर्धा जिंकली आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताने साखळीत सलग पाच विजय नोंदवले. भारताने अनुक्रमे यजमान चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना धूळ चारून अग्रस्थान मिळवले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत कोरिया आणि मग आता अंतिम फेरीत चीनला नमवून भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा मान मिळवला.

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला चीनने कडवी झुंज दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. मात्र चौथ्या सत्रात हरमनप्रीतच्याच पासवर जुगराज सिंगने ५१व्या मिनिटाला अप्रतिम गोल झळकावून भारताचा आघाडी मिळवून दिली. मग उर्वरित ९ मिनिटे भारताने यशस्वी बचाव केला व जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रशिक्षक फुल्टन यांनी या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.

“गेल्या काही वर्षांपासून भारताचा संघ अफलातून कामगिरी करत आहे. या स्पर्धेत आम्ही अधिक मैदानी गोल नोंदवले. यावरूनच हा संघ कुणा एका खेळाडूवर अवलंबून नाही हे दिसून येते. २०२८च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने आम्ही आतापासूनच संघबांधणी सुरू केली आहे. तुम्हाला आमची कामगिरी मैदानात त्यानुसार दिसेलच. या संघाचे कौतुक करावे तितके कमी आहे,” असे फुल्टन म्हणाले.

हॉकी महासंघाकडून रोख पारितोषिक

भारतीय हॉकी महासंघाकडून विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ३ लाख, तर प्रशिक्षकीय चमूतील सदस्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय हरमनप्रीत आणि निवृत्त गोलरक्षक यांना वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू आणि गोलरक्षक या पुरस्कारांसाठी नामांकन लाभल्याचेही महासंघाने जाहीर केले.

भारतासाठी हरमनप्रीतने या स्पर्धेत सर्वाधिक ७ गोल केले. त्याने ऑलिम्पिकमध्येही १० गोल नोंदवले होते.

मध्य प्रदेशातून येणार ५० हजार EVM; नवीन मशीनची दिली इसीआयएलला ऑर्डर; निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कसली कंबर

लाडक्या बहिणींना खुशखबर! ऑक्टोबरच्या हफ्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी

संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करा; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका; पाच हजार प्राध्यापकांच्या भरती मान्यतेला वित्त विभागाचा खोडा

Women’s World Cup : आज चुकीला माफी नाही! विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान