क्रीडा

पंजाबने इतिहास रचला; IPL मधील सर्वात कमी धावांचा बचाव केला; पॉटिंग म्हणतो- "प्रशिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीतील..."

PBKS VS KKR : आयपीएलमध्ये प्रथमच एका संघाने इतक्या कमी धावांचा यशस्वी बचाव केला. ऐतिहासीक विजयानंतर पंजाबच्या झुंझार खेळीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने कौतुक केले. तसेच, प्रशिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीतील हा...

Krantee V. Kale

आयपीएलमध्ये मंगळवारी संध्याकाळी पंजाबच्या मुल्लानपूर येथे झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर धावांचा महापूर अपेक्षित असताना दोन्ही संघांचे फलंदाज सपशेल ढेपाळले. मात्र, यामध्ये पंजाब किंग्जने बाजी मारली. अवघ्या १११ धावांत गारद झाल्यानंतर पंजाबने कोलकाता नाइट रायडर्सला १५.१ षटकांत ९५ धावांतच गुंडाळले. आयपीएलमध्ये प्रथमच एका संघाने इतक्या कमी धावांचा यशस्वी बचाव केला. पंजाबने ही लढत १६ धावांनी जिंकली.

मुल्लानपूर येथे झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ३ षटकांत बिनबाद ३३ अशी सुरुवात केली. मात्र हर्षित राणाने चौथ्या षटकात प्रियांश आर्या (२२) व कर्णधार श्रेयस अय्यर (०) यांना बाद केले. त्यानेच मग प्रभसिमरन सिंगचाही (३०) अडसर दूर केला. या तिघांचे झेल रमणदीप सिंगने घेतले. वरुण चक्रवर्ती व सुनील नरिन यांच्या फिरकी जोडीने पंजाबची आणखी बिकट अवस्था केली. वरुणने जोश इंग्लिस (२) व ग्लेन मॅक्सवेल (७) यांचे त्रिफळे उडवले, तर नरिनने सूर्यांश शेडगे (४), मार्को यान्सेन (१) यांना बाद केले. नेहल वधेरा (१०) व शशांक सिंगही (१८) अपयशी ठरले. त्यामुळे पंजाब १५.३ षटकांत १११ धावांत गारद झाला.

११२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाची सुरूवातही खराब झाली. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवरच त्यांची सलामीची जोडी फुटली. मार्को यान्सेन याने धडाकेबाज सुनील नारायणला त्रिफळाचीत करीत अडथळा दूर केला. बार्टलेटच्या वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर क्विंटन डीकॉक देखील झेलबाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी चांगली फटकेबाजी केली, पण संघाच्या ६२ धावा झालेल्या असताना युजवेंद्र चहलने रहाणेला पायचीत पकडत ही जोडी फोडली आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण पंचांच्या निर्णयाला रहाणेने आव्हान देत डीआरएस घेतला असता तर तो नाबाद होता हे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत केवळ १० धावांची भर पडली आणि रघुवंशीलाही चहलने बार्टलेटकडे झेल देण्यास भाग पडले. त्यानंतर तीन बाद ७२ वरुन थेट ८ बाद ७९ अशी त्यांची अवस्था झाली. वेंकटेश अय्यर (७), रिंकू सिंग (२), रमणदिप सिंग (०), हर्षित राणा (३) झटपट बाद झाले. आंद्रे रसेलच्या थोड्याफार फटकेबाजीमुळे संघाच्या कशाबशा ९५ धावा झाल्या असताना वैभव अरोरा देखील शून्यावर बाद झाला. अखेरच्या षटकात १६ धावा आवश्यक असताना पहिल्याच चेंडूवर रसेलला यान्सेनने क्लीन बोल्ड केले आणि पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. पंजाबकडून चहलने २८ धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले.

प्रशिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीतील हा कदाचित सर्वोत्तम विजय

या ऐतिहासीक विजयानंतर पंजाबच्या झुंझार खेळीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने कौतुक केले. तसेच, प्रशिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीतील हा कदाचित सर्वोत्तम विजय असेल, अशी प्रतिक्रियाही दिली.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची गाठ पडणार आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता