क्रीडा

Lausanne Diamond League : वर्षातील सर्वोत्तम भालाफेकीनंतरही नीरजला ९० मीटर अन् जेतेपदाची पुन्हा हुलकावणी!

Swapnil S

लुसाने : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला ९० मीटरच्या अंतरापासून पुन्हा एकदा दूर रहावे लागले. लुसाने येथील डायमंड लीगच्या ११व्या टप्प्यात नीरजने अखेरच्या प्रयत्नात ८९.४९ मीटर अंतर सर करून यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम भालाफेक केली. मात्र तरीही त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.६१ मीटरच्या भालाफेकीसह अग्रस्थान काबिज केले. मुख्य म्हणजे नीरजने या वर्षी अद्याप डायमंड लीगच्या एकाही टप्प्याचे जेतेपद पटकावलेले नाही.

२६ वर्षीय नीरजला आतापर्यंत कारकीर्दीत एकदाही ९० मीटरवर भालाफेक करता आलेली नाही. २०२२च्या डायमंड लीगमधील अंतिम फेरीत नीरजने ८९.९४ मीटर भालाफेक केली होती. हीच त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. काही दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत नीरजने ८९.४५ मीटर अंतर सर करून या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

गुरुवारी रात्री नीरजने ऑलिम्पिकमधील कामगिरीला मागे टाकताना ८९.४९ मीटर अंतरावर भालाफेक केली. मात्र तरीही त्याला अग्रस्थान मिळवता आले नाही. मुख्य म्हणजे पाचव्या प्रयत्नापर्यंत नीरज चौथ्या स्थानी होता. पाचव्या प्रयत्नात त्याने ८५.५८ मीटर भालाफेक केली आणि मग अखेरच्या प्रयत्नात सर्वस्व झोकून देत दुसरे स्थान प्राप्त केले. अँडरसनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यंदा मात्र त्याने दुसऱ्या प्रयत्नात ९०.६१ मीटर अंतर गाठून पहिला क्रमांक पक्का केला. जर्मनीच्या जुलियन वेबरने ८७.०८ मीटरसह तिसरे स्थान मिळवले.

स्नायूंच्या दुखापतीने नीरजला गेल्या काही काळापासून सतावले आहे. मात्र त्याने डायमंड लीगमध्ये सहभागी होण्यास प्राधान्य देत नंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि आता अँडरसन यांनी ९० मीटरचे अंतर सर केल्यामुळे नीरजपुढील आव्हानांत वाढ झाली आहे. अर्शदने या टप्प्यातून माघार घेतली होती. मात्र पुढील टप्प्यात तोसुद्धा परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२मध्ये डायमंड लीग जिंकणाऱ्या नीरजला आता पुढील डायमंड लीगच्या टप्प्यात अधिक मेहनत घ्यावी लागेल.

गुणतालिकेत नीरज तिसऱ्या स्थानी

-डायमंड लीगच्या अंतिम फेरीस पात्र ठरण्याकरिता नीरजला अव्वल ६ खेळाडूंत स्थान टिकवणे गरजेचे आहे. १४ सप्टेंबर रोजी डायमंड लीगचा अखेरचा म्हणजेच १५वा टप्पा होईल.

- नीरज सध्या संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी असून त्याच्या खात्यात १५ गुण आहेत. वेबरचेसुद्धा १५ गुण आहेत. अँडरसन २१ गुणांसह अग्रस्थानी आहे, तर चेक प्रजासत्ताकचा जेकब वॅडेलच १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- यापूर्वी, मे महिन्यातील दोहा येथील टप्प्यातही नीरजने दुसरे स्थान मिळवले होते. आता ५ सप्टेंबर रोजी झुरिच येथे डायमंड लीगच्या पुढील टप्प्यात भालाफेकचा समावेश असल्याने नीरजही त्यामध्ये सहभागी होईल.

अखेरच्या प्रयत्नात हंगामातील सर्वोत्तम भालाफेक केल्यामुळे मी आनंदी आहे. मात्र सुरुवातीच्या प्रयत्नांवर मला लक्ष द्यावे लागेल. ९० मीटरचे अंतर कधी ना कधी सर होईलच. मात्र यासाठी मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सज्ज असणे गरजेचे आहे. - नीरज चोप्रा

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा