मेस्सी आला आणि १० मिनिटांत निघून गेला...; फुटबॉलपटूच्या क्षणिक एन्ट्रीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांचा राडा  
क्रीडा

Messi Viral Video : मेस्सी आला आणि १० मिनिटांत निघून गेला...; फुटबॉलपटूच्या क्षणिक एन्ट्रीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांचा राडा

दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात मेस्सी अवघ्या काही मिनिटांसाठीच उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त चाहत्यांनी आयोजकांविरोधात बाटल्या फेकल्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळही उडाला.

किशोरी घायवट-उबाळे

सध्या भारत दौऱ्यावर असणारा अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी शनिवारी (दि.१३) पहाटे कोलकात्यात दाखल झाला. त्याच्या उपस्थितीने कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर वातावरण जल्लोषमय झाले. शनिवारी पहाटे मेस्सी आपल्या सहकाऱ्यांसह लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल यांच्यासोबत शहरात पोहोचला. दरम्यान, दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या कार्यक्रमात मेस्सी अवघ्या काही मिनिटांसाठीच उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर संतप्त चाहत्यांनी आयोजकांविरोधात बाटल्या फेकल्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळही उडाला.

नेमकं काय घडलं?

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियमवर अनेक चाहते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाची जर्सी घालून पोहचले होते. मेस्सी स्टेडियममध्ये दाखल झाल्यानंतर त्याने चाहत्यांना अभिवादन करत सन्मान फेरी (लॅप ऑफ ऑनर) घेतली. त्यानंतर गायक अनीक धर याने मेस्सीच्या सन्मानार्थ खास रचलेले गीत सादर केले. अर्जेंटिनाच्या या दिग्गज फुटबॉलपटूला समर्पित नृत्याविष्कारही यावेळी सादर करण्यात आला.त्यानंतर, GOAT Tour India 2025 अंतर्गत कोलकात्यात आलेल्या लिओनेल मेस्सीने लेक टाउन परिसरातील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबमध्ये उभारण्यात आलेल्या आपल्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल पद्धतीने अनावरण केले. या अनावरणासाठी लेक टाउनमध्ये हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.

चाहत्यांचा संताप अनावर

यादरम्यान, लिओनेल मेस्सीच्या उपस्थितीची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली. जेमतेम १० मिनिटांतच लिओनेल स्टेडियममधून बाहेर पडला. त्याच्याअचानक निघून जाण्याने स्टेडियममधील वातावरण तणावपूर्ण झाले. मेस्सी अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेळ उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांनी आयोजक, उपस्थित अधिकारी आणि राजकीय नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही चाहत्यांनी स्टेडियममध्ये बाटल्या फेकल्या, खुर्च्या फेकल्या, तर काहींनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. आयोजकांकडून कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात गंभीर चुका झाल्याचा आरोप चाहत्यांनी केला.

राजकीय गर्दीमुळे मेस्सीने फेरी रद्द केल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय नेते, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मेस्सीभोवती गर्दी केल्यामुळे त्याने नियोजित सन्मान फेरी पूर्ण न करता कार्यक्रम लवकर आटोपता घेतला. यामुळे मेस्सी आणि चाहत्यांमध्ये अपेक्षित संवादच होऊ शकला नाही.

पहाटेपासूनच चाहत्यांची गर्दी

मेस्सी सकाळी ११ नंतर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तरीही देशभरातून आलेले चाहते सकाळी ८ वाजल्यापासूनच स्टेडियममध्ये जमले होते. अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाची जर्सी घातलेले चाहते “मेस्सी, मेस्सी”च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकत होते.

महागडी तिकिटे, पण केवळ एक झलक

या कार्यक्रमासाठी तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात होते. अनेक चाहते देशाच्या विविध भागांतून प्रवास करून कोलकात्यात पोहोचले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना मेस्सीची केवळ झलकच पाहायला मिळाल्याने नाराजी अधिकच वाढली.

या घटनेमुळे आयोजकांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, चाहत्यांचा संताप कार्यक्रमाच्या नियोजनातील गंभीर चुका अधोरेखित करणारी बाब ठरली आहे.

कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेल्याने मेस्सीच्या चाहत्यांचा उद्रेक; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा माफीनामा, म्हणाल्या...

Lionel Messi's India Tour 2025: पुतळ्याचे अनावरण, स्टेडियममध्ये राडा; कोलकात्यानंतर मेस्सी कुठे अन् कोणाला भेटणार? जाणून घ्या मेस्सीचा संपूर्ण भारत दौरा

"महाराष्ट्रात लहान मुलं-तरुणी पळवल्या जातायत..."; राज ठाकरेंची गंभीर चिंता, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ठोस कारवाईची मागणी

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक; हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

Kala Ghoda Arts Festival : काळा घोडा कला महोत्सवाच्या तारखा जाहीर; यंदा काय असणार खास?