क्रीडा

मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडकावर नाव कोरले, मुंबई उपविजेतेपदावर

वृत्तसंस्था

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी मध्य प्रदेशने अखेर प्रथमच रणजी करंडकावर नाव कोरले. मध्य प्रदेशने सामन्याच्या शेवटच्या दिवशी सहा विकेट्सने मुंबईचा पराभव केला. या पराभवामुळे ४१ वेळा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला. मध्य प्रदेशने १९९९मध्ये चंद्रकात पंडितच्या कर्णधारपदाखाली अंतिम फेरी गाठली होती; मात्र त्यांना कर्नाटककडून ९६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. चंद्रकात पंडित हेच मुख्य प्रशिक्षक असताना मध्य प्रदेशने रणजी करंडकावर नाव कोरले. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातच मुंबईने आपल्या उर्वरित आठ विकेट गमावल्या. त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात मुंबईच्या सुवेद पारकरने ५८ चेंडूंत ५१ धावा केल्या. सरफराझ खानने ४८ चेंडूंत ४५ धावा केल्या. कर्णधार पृथ्वी शॉने ५२ चेंडूंत ४४ धावांचे योगदान दिले. मध्य प्रदेशकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक चार विकेट्स टिपल्या. शुभम शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये एकूण ९८२ धावा करणाऱ्या सर्फराझ खानला स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणून गौरविण्यात आले. मध्य प्रदेशने १०८ धावांचे निर्धारित लक्ष्य २९.५ षट्कांत चार गडी गमावत साध्य केले. मध्य प्रदेशसाठी दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने ५५ चेंडूंत सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी प्रत्येकी ३० धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात सरफराझ खानने शानदार फलंदाजी करताना १३४ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालने ७८, तर पृथ्वी शॉने ४७ धावांचे योगदान दिले होते. मध्य प्रदेशच्या गौरव यादवला चार आणि अनुभव अग्रवालला तीन विकेट्स मिळाल्या होत्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात ५३६ धावा केल्या होत्या. रजत पाटीदार, शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी या चमकदार कामगिरी केली होती. रजत पाटीदारने १२२ धावांची शानदार खेळी केली, तर यश दुबेने १३३ आणि शुभम शर्माने ११६ धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक पाच विकेट‌्स घेतल्या होत्या.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम