लखनाै : मुंबईचा १८ वर्षीय प्रतिभावान सलामीवीर आयुष म्हात्रेच्या (५३ चेंडूंत नाबाद ११० धावा) शतकी वादळाचा शुक्रवारी विदर्भाला तडाखा बसला. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना विदर्भाला ७ गडी व १३ चेंडू राखून धूळ चारली.
लखनाैच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत विदर्भाने दिलेले १९३ धावांचे लक्ष्य मुंबईने १७.५ षटकांत गाठले. विरारच्या आयुषने तब्बल ८ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना टी-२० कारकीर्दीतील पहिलेच शतक साकारले. त्याला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (३० चेंडूंत ३५) व शिवम दुबे (१९ चेंडूंत नाबाद ३९) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने अ-गटात तूर्तास दोन सामन्यांतील दोन विजयांच्या आठ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. आंध्र प्रदेश सरस धावगतीमुळे गटात अग्रस्थानी आहे. मुंबईची आता रविवारी आंध्रशी गाठ पडेल.
दरम्यान, २६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू झाली. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करत आहे.
रणजीप्रमाणेच या स्पर्धेतही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उरलेल्या सहा संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. मुंबईपुढे यंदा जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. पहिल्या लढतीत मुंबईने रेल्वेवर मात केली.
शुक्रवारी दुसऱ्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने २० षटकांत ९ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. अमन मोखाडे (६१) व अथर्व तायडे (६४) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. मात्र बिनबाद ११५ धावांवरून विदर्भाचा डाव घसरला. दुबे व फिरकीपटू अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. कर्णधार हर्ष दुबे (१०), यश राठोड (२३), ध्रुव शोरे (१) यांनी निराशा केली.
मग लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने अनुभवी अजिंक्य रहाणे (०) व हार्दिक तामोरे (१) यांना स्वस्तात गमावले. मुंबईची २ बाद २१ अशी स्थिती असताना आयुष व सूर्यकुमार यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भर घातली. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना लक्ष वेधलेल्या आयुषने त्याची सध्या भविष्यातील ताऱ्यांत का गणना केली जाते, हे दाखवून दिले. आयुषने २० चेंडूंत अर्धशतक, तर ४९ चेंडूंत शतकाची वेस ओलांडली.
तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील तिन्ही प्रकारांत (प्रथम श्रेणी, लिस्ट-ए, टी-२०) शतक झळकावणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. आयुषचे सध्याचे वय १८ वर्षे व १३५ दिवस असून त्याने रणजी, विजय हजारे व मुश्ताक अली अशा तिन्ही प्रकारच्या स्पर्धांत शतक केले आहे. आयुषने भारताच्याच रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. रोहितने १९ वर्षे व ३३९ दिवस इतके वय असताना हा पराक्रम केला होता.
सूर्यकुमार बाद झाल्यावर मग आयुषने दुबेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचून १८व्या षटकातच संघाचा विजय साकारला. दुबेने ३ चौकार-षटकार लगावून झटपट नाबाद ३९ धावा फटकावल्या. तर आयुष शतकी खेळीसह नाबाद राहिला. त्यामुळे मुंबईने १९३ धावांचे लक्ष्यही सहज गाठून दुसरा विजय नोंदवला.
भारताचा युवा संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिग्यान कुंडू, हर्वंश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलान पटेल, नमन पुष्पक, दीपेश डी., हेनिल पटेल, किशन सिंग, उधव मोहन, आरोन जॉर्ज. राखीव : राहुल कुमार, आदित्य रावत, हेमचुदेशन.
संक्षिप्त धावफलक
-विदर्भ : २० षटकांत ९ बाद १९२ (अथर्व तायडे ६४, अमन मोखाडे ६१; शिवम दुबे ३/३३, अथर्व अंकोलेकर ३/३०) पराभूत वि. g मुंबई : १७.५ षटकांत ३ बाद १९४ (आयुष म्हात्रे नाबाद ११०, शिवम दुबे नाबाद ३९, सूर्यकुमार यादव ३५; यश ठाकूर १/२१)
-निकाल : मुंबई विजयी (४ गुण)
-सामनावीर : आयुष म्हात्रे