क्रीडा

मालिकेत आघाडीसाठी पाकिस्तानला १२० धावांची तर श्रीलंकेला सात फलंदाज बाद करण्याची आवश्यकता

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी डावाची सुरुवात आत्मविश्वास-पूर्ण केली

वृत्तसंस्था

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी विजयासाठी ३४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने खेळ थांबेपर्यंत ३ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारली. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडीसाठी पाकिस्तानला अखेरच्या दिवशी बुधवारी आता केवळ १२० धावांची आवश्यकता आहे, तर श्रीलंकेला आणखी सात फलंदाज बाद करावे लागतील. लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल्ला शफिकने शानदार नाबाद शतक (२८९ चेंडूंत नाबाद ११२); तर कर्णधार बाबर आझमने (१०४ चेंडूंत ५५) अर्धशतक झळकविले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी डावाची सुरुवात आत्मविश्वास-पूर्ण केली. या दोघांनी ८७ धावांची सलामी दिली. ही जोडी जमल्यासारखी वाटत असतानाच इमामला निरोशन डिकवेलाने रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर यष्टिचित केले. इमामने ७३ चेंडूंत तीन चौकारांसह ३५ धावा केल्या. अझर अली (३२ चेंडूंत ६) फार काही करू शकला नाही. प्रभात जयसूर्याने त्याला धनंजय डिसिल्वाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

कर्णधार बाबर आझम आक्रमण आणि संरक्षण यांचा मेळ साधत असतानाच प्रभात जयसूर्याने त्याला त्रिफळाचित केले. बाबरने एक षट्कार आणि चार चौकारांसह १०४ चेंडूंत ५५ धावा केल्या. मोहम्मद रिझवानने खेळ संपेर्यंत १२ चेंडूंना सामोरे जात नाबाद सात धावा करत शतकवीर अब्दुल्लाला दमदार साथ दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आला होता. पाकिस्तानचा पहिला डाव २१८ धावांत आटोपला. त्यामुळे श्रीलंकेला पहिल्या डावात अवघ्या चार धावांची नाममात्र आघाडी मिळाली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात सर्वबाद ३३७ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेची एकूण आघाडी ३४१ धावांची झाली आणि पाकिस्तानला विजयासाठी ३४२ धावांचे लक्ष्य मिळाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत