क्रीडा

पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना पावसामुळे पाण्यात!

दमदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या.

वृत्तसंस्था

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीचा पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना बुधवारी पावसामुळे पाण्यात गेला. विजयासाठीचे १५५ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने २.२ षटकांत बिनबाद १९ धावा केलेल्या असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पूर्ण खेळ होऊ शकला नाही. हा सामना कोणत्याही निकालाशिवायच सोडून देण्यात आला.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मोहम्मद नबी (३७ चेंडूंत ५१), इब्राहिम झमान (३४ चेंडूंत ३५) आणि उस्मान घनी (२० चेंडूंत नाबाद ३२) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या.

नबीने अर्धशतकी खेळीत एक षटकार आणी पाच चौकार लगावले. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट‌्स घेतले. मोहम्मद नवाझ, शादाब खान यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

शाहीनच्या यॉर्करमुळे अफगाणिस्तानचा रहमानउल्ला रुग्णालयात

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या सामन्यादरम्यान शाहीन शाह आफ्रिदीने टाकलेल्या खतरनाक यॉर्करमुळे अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अफगाणिस्तानला आपला पहिला सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध खेळायचा असताच रहमानउल्ला जखमी झाला. डावाच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शाहीनने धोकादायक यॉर्कर टाकला. हा चेंडू यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्लाला समजला नाही. त्यामुळे त्याला स्वत:ला सावरता न आल्याने चेंडू थेट त्याच्या डाव्या पायाच्या बोटाला लागला. त्याच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की गुरबाजला मैदानाबाहेर जाण्यासाठी चालता येत नव्हते. त्याला पाठीवर उचलून घेऊन जावे लागले. रुग्णालयात रहमानउल्लाच्या डाव्या पायाचे स्कॅनिंग करण्यात आले.

शाहीनचा पहिला स्पेल खतरनाक

या सामन्यात शाहीनने ४ षटकांत २९ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. तथापि, त्याचा पहिला स्पेल अधिक धोकादायक होता. त्यात त्याने दोन षटकांच्या गोलंदाजीत रहमानुल्ला गुरबाज आणि हजरतुल्ला झाझाई यांना पॅव्हेलियनमध्ये पाठविले. हे दोन्ही फलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा आधार समजले जातात. अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडसह ग्रुप-१ मध्ये आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामनाही रद्द

टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना बुधवारी संततधार पावसामुळे एकही चेंडू टाकताच रद्द करण्यात आला. पहिल्या सराव सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला होता. शौकिनांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती.

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण

Thane Election : परिवहन मंत्री सरनाईक आणि खासदार म्हस्के यांच्या मुलांचे तिकीट कापले

मीरा-भाईंंदरमध्ये भाजप व शिंदे गट स्वबळावर; जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल