क्रीडा

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अंदाज वर्तवणे चुकीचे - सनथ जयसूर्या

लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत असलेला जयसूर्या बुधवारी एका टूरिझम इव्हेंटनिमित्त मुंबईत आला होता.

ऋषिकेश बामणे

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाने मिळवलेले विजेतेपद अनेकांसाठी धक्कादायक होते. परंतु श्रीलंकेचाच माजी डावखुरा फलंदाज सनथ जयसूर्याला यामुळे मूळीच धक्का बसला नाही. तसेच ट्वेन्टी-२० प्रकार हा धोकादायक असून यासंबंधी कोणतेही अंदाज वर्तवणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मतही ५३ वर्षीय जयसूर्याने व्यक्त केले.

सध्या भारतातील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज तसेच लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळत असलेला जयसूर्या बुधवारी एका टूरिझम इव्हेंटनिमित्त मुंबईत आला होता. यावेळी श्रीलंकेचे पर्यटनमंत्री हरिन फर्नांडोसुद्धा उपस्थित होते. श्रीलंकन देश सध्या आणीबाणीतून सावरत असून या देशाने आर्थिक मदतीसाठी साद घातली आहे.

दरम्यान, दसुन शनकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने काही आठवड्यांपूर्वी पाचव्यांदा आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारत, पाकिस्तान, बांगलादेश या संघांच्या तुलनेत श्रीलंकेला कमी लेखले जात होते. त्यातच पहिल्या लढतीत श्रीलंकेला अफगाणिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र श्रीलंकेने झोकात पुनरागमन करून अनुक्रमे बांगलादेश, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान या संघांना धूळ चारून विजेतेपद पटकावले.

‘‘श्रीलंकेने आशिया चषक जिंकल्यामुळे माझ्या भुवया उंचावलेल्या नाहीत. सध्याच्या श्रीलंकन संघात मोठ्या किंवा तारांकित खेळाडूंचा समावेश नसला तरी ते मेहनती आहेत. पहिली लढत गमावल्यानंतरही त्यांनी मानसिक खच्चीकरण न होऊ देता चुका सुधारल्या. त्यांनी सांघिकदृष्ट्या कामगिरी उंचावली. त्यामुळे ते विजेतेपदाचे हकदार होते,” असे १९९६च्या विश्वविजेत्या संघाचा भाग असलेला जयसूर्या म्हणाला.

त्याशिवाय या संघाची १९९६च्या संघाशी तुलना करणेही त्याने टाळले. याव्यतिरिक्त आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोणता संघ कितपत मजल मारेल, अथवा अंतिम फेरीतील दोन संघ कोणती असतील, तसेच भारतीय संघाविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्याने नकार दिला. “ट्वेन्टी-२० क्रिकेट हा प्रकार फारच धोकादायक आणि वेगवान आहे. त्यामुळे मी या प्रकाराशी निगडीत प्रश्नांना उत्तरे देणे टाळतो. मात्र श्रीलंका संघ विश्वचषकातही छाप पाडेल,’’ असे जयसूर्याने सांगितले. श्रीलंकेला विश्वचषकातील सुपर-१२ फेरीसाठी पात्र करण्याकरता पात्रता फेरीचा अडथळा ओलांडावा लागणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक