Photo : X (RohitPawar)
क्रीडा

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या घेऱ्यात अडकलेल्या या संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद वैध याचा वाद थेट कोर्टात पोहोचला होता. अखेर रविवारी पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

“कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील होतकरू पैलवानांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असेल. या निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे मनापासून आभार,” असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

तसेच गेल्यावर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्यामाध्यमातून भरवण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे ६६वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या भरवली होती. आता तर त्यांनी कुस्तीगीर परिषदेच्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर मजल मारली आहे.

स्व. मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मुहूर्तमेढ रोवली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेली ४० वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांनी चालणाऱ्या या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक पैलवानांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. विविध पदके प्राप्त केलेल्या अनेक गुणवान पैलवानांना शासनामध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. शरद पवार याचे हेच काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता त्यांचेच नातू रोहित पवार यांच्यावर आहे.

पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा? श्रीनगरमध्ये ऑपरेशन 'महादेव'; चकमकीत ३ दहशतवादी ठार

नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय; बुद्धीबळ विश्वचषकात बाजी, ठरली पहिली भारतीय महिला विश्वविजेती

"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

Baramati : नियतीचा क्रूर खेळ! दोन मुलींसह वडिलांचा अपघातात मृत्यू; धक्क्याने २४ तासांतच आजोबांनीही सोडला जीव

"आता इतक्या पैशांमध्ये..."; ‘शोले’च्या तिकीटाचा फोटो शेअर करत बिग बींची खास पोस्ट