मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून आगामी सामन्यात एकत्रित खेळताना दिसतील. २३ जानेवारीपासून रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होत असून मुंबईच्या बीकेसी येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मुंबईची लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा १७ सदस्यीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसताना बीसीसीआयने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती सर्व खेळाडूंना लागू केली आहे. त्यामुळे आता रोहित तब्बल १० वर्षांनी मुंबईकडून रणजी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतच रोहितने रणजी स्पर्धेत खेळणार असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी २०१५मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रोहित अखेरचा रणजी सामना खेळला होता.
२३ ते २६ जानेवारी या कालावधीत जम्मू आणि काश्मीरविरुद्धचा सामना झाल्यावर ३० जानेवारीपासून मुंबईची मेघालयविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्यातही रोहित खेळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. रणजी स्पर्धेतील साखळी सामने ४ दिवसांचे असतात. त्यामुळे ही लढत २ फेब्रुवारीपर्यंत लांबू शकते. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होणार असून मालिकेच्या किमान ३-४ दिवसांपूर्वी भारतीय संघ नागपूरला रवाना होणे अपेक्षित आहे. आठवडाभराच्या कालावधीतच लाल आणि पांढऱ्या चेंडूचे सामने खेळण्यासाठी आम्ही खेळाडू मानसिकदृष्ट्या तयार असतो, असेही रोहितने सांगितले होते.
काही दिवसांपूर्वी रोहित मुंबईच्या रणजी संघासह सराव करताना दिसला होता. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यामुळे रोहितच्या भारतीय कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सिडनीतील पाचव्या कसोटीत रोहितने स्वत:हून संघाबाहेर राहण्याचा निर्णयही घेतला. मात्र कसोटीतून निवृत्ती पत्करण्याचा आपला मुळीच विचार नाही, असेही रोहितने त्यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यशस्वीला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो रणजी स्पर्धेत खेळणार आहे. अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्व करणार असून श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, असे भारतीय संघाकडून खेळलेले खेळाडू या संघाचा भाग असतील. सर्फराझ खान मात्र पाठीच्या दुखापतीमुळे पुढील काही रणजी सामन्यांना मुकणार आहे.
मुंबईचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे, आकाश आनंद, तनुष कोटियन, शम्स मुलाणी, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डीसोझा, रॉयस्टन डायस, कर्श कोठारी.
विराट खेळण्याची शक्यता; राहुलची माघार
विराट कोहली दिल्ली संघाच्या पहिल्या लढतीला मानेच्या दुखापतीमुळे मुकणार असला तरी ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. दिल्लीकडून २०१२मध्ये अखेरचा रणजी सामना खेळलेल्या विराटची सध्या मान दुखत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर विराटने यावर इंजेक्शनसुद्धा घेतले. मात्र अद्याप त्याचे दुखणे पूर्णपणे बंद न झाल्याने तो दिल्ली संघाकडून सौराष्ट्रविरुद्धचा आगामी रणजी सामना खेळणार नाही. ३० जानेवारीपासून दिल्लीचा रेल्वेविरुद्धही सामना आहे. दुसरीकडे के. एल. राहुलने हाताच्या कोपऱ्याला काहीशी दुखापत झाल्याने कर्नाटक संघाकडून पंजाबविरुद्धची लढत न खेळण्याचे ठरवले आहे.