एक्स @BCCIdomestic
क्रीडा

शार्दूलच्या शतकाचा जम्मू-काश्मीरला तडाखा; ७ बाद १०१ वरून मुंबईची दुसऱ्या दिवसअखेर २७४ धावांपर्यंत मजल; १८८ धावांची आघाडी

सध्या रस्तेमार्गे बदलापूरहून मुंबई व नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासाचा अवधी लागतो.

ऋषिकेश बामणे

ऋषिकेश बामणे/मुंबई

शार्दूल ठाकूर हा क्रिकेट विश्वात ‘लॉर्ड’, ‘संकटमोचक’ अशा विविध नावांनी का ओळखला जातो, याचा प्रत्यय शुक्रवारी तमाम क्रीडारसिकांना पुन्हा एकदा आला. मुंबईचा संघ ७ बाद १०१ अशा संकटात असताना शार्दूलने ११९ चेंडूंत नाबाद ११३ धावांची जिगरबाज शतकी खेळी साकारली. त्याला तनुष कोटियनच्या (११९ चेंडूंत नाबाद ५८ धावा) खडूस अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. या दोघांनी रचलेल्या दीडशतकी भागीदारीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरला जोरदार प्रत्युत्तर दिले.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या अ-गटातील या लढतीच्या दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने ६७ षटकांत ७ बाद २७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसऱ्या डावात मुंबई आता १८८ धावांनी आघाडीवर असून शनिवारी तिसऱ्या दिवशी शार्दूल-तनुषची जोडी जम्मूला आणखी किती काळ हैराण करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तूर्तास शार्दूल-तनुष यांच्यात १७३ धावांची भागीदारी झाली आहे.

उभय संघांतील या लढतीत तारांकित फलंदाजांचा भरणा असूनही मुंबईचा पहिला डाव गुरुवारी १२० धावांतच आटोपला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर जम्मूने ७ बाद १७४ धावा केल्या होत्या. तेथून पुढे शुक्रवारी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना जम्मूचे उर्वरित फलंदाज फार काठ तग धरू शकले नाहीत. मोहित अवस्थीने प्रथम श्रेणी कारकीर्दीत पाचव्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याने कर्णधार पारस डोग्राला (१९) पायचीत पकडले. तर शार्दूलने युधविर सिंगला बाद करून जम्मूचा पहिला डाव ४६.३ षटकांत २०६ धावांत गुंडाळला. जम्मूने पहिल्या डावात ८६ धावांची आघाडी घेतली.

त्यानंतर दुसऱ्या डावांत मुंबईच्या तारांकित फलंदाजांकडून चमकदार कामगिरी अपेक्षित होती. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक सुरुवात करताना १३ षटकांत ५४ धावांची सलामी नोंदवली. विशेषत: रोहितने एकाच षटकात दोन चौकार व एक षटकार लगावून चाहत्यांची मने जिंकली. अखेर १४व्या षटकात युधविरने रोहितचा अडसर दूर केला. १० वर्षांनी रणजी सामना खेळणाऱ्या रोहितने ३५ चेंडूंत २८ धावा केल्या. यानंतर मुंबईची फलंदाजी ढेपाळली.

यष्टिरक्षक हार्दिक तामोरे (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. तर युधविरने यशस्वीलाही (२६) बाद करून मुंबईची ३ बाद ५७ अशी स्थिती केली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र श्रेयस ४ चौकारांसह १७ धावा काढून बाद झाला. त्याच षटकात अकीब नबीने शिवम दुबेला भोपळाही न फोडता माघारी पाठवले. दोन्ही डावांत दुबे शून्यावर बाद झाला. उपहाराला मुंबईची ५ बाद ८६ अशी स्थिती होती. त्यांनी जम्मूची आघाडी कशीबशी फिटवली.

मात्र दुसऱ्या सत्रात १० मिनिटांतच उमर नाझीरने रहाणेला (१६) जाळ्यात अडकवले, तर नबीने शम्सला (४) पायचीत पकडून मुंबईची ७ बाद १०१ अशी अवस्था केली. त्यानंतर आठव्या क्रमांकावरील शार्दूल आणि नवव्या क्रमांकावरील तनुष यांची जोडी जमली. या दोघांनी प्रथम एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. हळूहळू मग शार्दूलने नेहमीच्या शैलीत आक्रमण सुरू केले. पहिल्या डावातसुद्धा ७ बाद ४७ वरून शार्दूल-तनुषने मुंबईला ११० धावांपर्यंत नेले होते. त्यापुढे एक पाऊल टाकताना या दोघांनी दुसऱ्या सत्रात आणखी पडझड होऊ न देता मुंबईला १७२ धावांपर्यंत नेले.

तिसऱ्या सत्रात मग शार्दूल आणि तनुषने जम्मूच्या गोलंदाजांच्या अक्षरश: नाकीनऊ आणले. प्रथम शादूर्लने अर्धशतकाची वेस ओलांडली. मग धावगती वाढवताना त्याने शतकाच्या दिशेने कूच केली. वेगवान गोलंदाजांना यश मिळत नसल्याने जम्मूने अब्दुल समद, वंशज शर्मा या फिरकीपटूंनीही गोलंदाजी दिली. मात्र शार्दूलने सर्वांनाच चोप दिला. अखेर स्वीपचा फटका खेळून शार्दूलने १७ चौकारांसह कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. शतकानंतर त्याने केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता. गतवर्षी तमिळनाडूविरुद्ध उपांत्य फेरीतही शार्दूलने शतक झळकावले होते. दुसऱ्या बाजूने तनुषनेही ६ चौकारांसह १४वे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे मुंबईने अडीशचे धावांचा पल्ला गाठला. तूर्तास जम्मूसाठी नबीने ३ बळी मिळवले आहेत.

शार्दूल-तनुषची जोडी ठाण मांडून असून आता शनिवारी मुंबईने आणखी ५० ते १०० धावांची भर घालून जम्मूपुढे किमान २५० धावांचे लक्ष्य ठेवले, तर सामन्यात वेगळीच रंगत निर्माण होईल.

शार्दूलने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने गतवर्षी मार्चमध्ये तमिळनाडूविरुद्ध रणजीच्या उपांत्य सामन्यात पहिले शतक साकारले होते. मुख्य म्हणजे तेव्हाही ७ बाद १०६ या स्थितीतून शार्दूलने शतक झळकावले होते.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ३३.२ षटकांत सर्व बाद १२०

जम्मू आणि काश्मीर (पहिला डाव) : ४६.३ षटकांत सर्व बाद २०६ (शुभम खजुरिया ५३, आबिद मुश्ताक ४४; मोहित अवस्थी ५/५२)

मुंबई (दुसरा डाव) : ६७ षटकांत ७ बाद २७४ (शार्दूल ठाकूर नाबाद ११३, तनुष कोटियन नाबाद ५८; अकीब नबी ३/६९, युधविर सिंग २/६३)

चाहत्यांचा दमदार प्रतिसाद

शुक्रवारी सायंकाळी खेळ संपेपर्यंत चाहत्यांनी बीकेसीचे मैदान सोडले नाही. रोहित व यशस्वी यांच्या दमदार सलामीचा आस्वाद सुटल्यानंतर काही चाहते निराश झाले. तसेच मुंबईची फलंदाजी ढेपाळल्यावर लढत दुसऱ्याच दिवशी संपणार की काय, अशी भीती चाहत्यांच्या तोंडावर दिसून येत होती. मात्र शार्दूल व तनुष यांनी केलेल्या प्रतिकारामुळे चाहत्यांना आनंद झाला. विशेषत: शार्दूलने शतक झळकावल्यावर सर्व चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करतानाच उभे राहून त्याला मानवंदना दिली. जवळपास ३०० ते ४०० प्रेक्षक शुक्रवारी दिवसभर खेळ पाहत होते.

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित तंबूत परतला

पहिल्या डावात फक्त ३ धावा करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. रोहितने ३५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह २८ धावा केल्या. मात्र याचे त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. तरीही रोहितने सरळ लगावलेला लॉफ्टेड शॉट आणि पूलचा फटका चाहत्यांची वाहवा मिळवणारा ठरला. आता शनिवारी रोहित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्यावरही संघासाठी कसे योगदान देतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच ३० जानेवारीपासून बीकेसी येथेच पुढील रणजी सामना होणार असल्याने, त्यामध्ये रोहित खेळण्याची शक्यता आहे.

माझ्या क्षमतेविषयी मीच बोलणे चुकीचे ठरेल. इतरांनी माझ्या कामगिरीविषयी चर्चा केलेली अधिक बरे. जेव्हा खेळपट्टी चांगली असते अथवा संघ सुस्थितीत असतो, तेव्हा सर्वच छान कामगिरी करतात. मात्र दडपणाखाली प्रतिकूल परिस्थितीत कामगिरी करणाऱ्यांना अधिक प्राधान्य द्यायला हवे, असे मला वाटते.

- शार्दूल ठाकूर

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन