मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावल्यावर हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा हे खेळाडू सोमवारी मायदेशात परतले. त्यानंतर मंगळवारी सकाळीच दोन्ही खेळाडूंनी आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) तयारीला प्रारंभ करताना आपापल्या संघाच्या सराव शिबिराला हजेरी लावली.
२२ मार्चपासून आयपीएलच्या १८व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. गतविजेते कोलकाता आणि बंगळुरू यांच्यात आयपीएलचा सलामीचा सामना रंगणार आहे. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरपर्यंत आयपीएलचा धुमाकूळ सुरू असेल. त्यामुळेच यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात येणार नाही. खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी, या हेतूने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. सोमवारी सायंकाळपासून भारताचे काही खेळाडू टप्प्याटप्प्याने आपापल्या राहत्या घरी परतले.
आयपीएलमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. मंगळवारी सकाळी मुंबईने ट्विटरवर हार्दिकच्या आगमनाची पोस्ट टाकली. वानखेडे स्टेडियमवर सध्या मुंबईचे सराव शिबीर सुरू झाले आहे. रोहित शर्मासुद्धा लवकरच दाखल होणे अपेक्षित आहे. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा यांच्याविषयी तूर्तास कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
दुसरीकडे अष्टपैलू जडेजा पहाटे चार वाजता थेट चेन्नईच्याच ताफ्यात दाखल झाला. चेन्नई संघाने ट्वीट करून याविषयी माहिती दिली. रविवारी रात्री १०च्या सुमारास अंतिम फेरी संपल्यानंतर ३० तासांमध्ये जडेजा चेन्नईच्या सराव शिबिरात परतल्याने त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील उर्वरित खेळाडू १६ मार्चपर्यंत आपापल्या फ्रँचायझी संघात दाखल होतील, असे अपेक्षित आहे. २५ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल.
रोहितसह अन्य खेळाडूंचे जल्लोषात आगमन!
भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडू सोमवारी रात्रीपर्यंत मायदेशात परतले, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. मात्र काही खेळाडूंनी २-३ दिवस कुटुंबीयांसह दुबईत राहण्यास प्राधान्य दिले आहे, असे समजते.
रोहितचे सोमवारी रात्री मुंबईतील विमानतळावर आगमन झाले, तेव्हा चाहत्यांनी गर्दी केली होती. रोहितसाठी यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या. काही वेळातच श्रेयस अय्यरही मुंबईत परतला. हर्षित राणा व प्रशिक्षक गौतम गंभीर दिल्लीत परतले आहेत. हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा हे खेळाडू अनुक्रमे मुंबई व चेन्नईत दाखल होऊन आपापल्या आयपीएल संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाले आहेत. २५ मेपर्यंत आयपीएल रंगणार असल्याने बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीतील खेळाडूंना १५ मार्चपर्यंत विश्रांती करण्याची मुभा दिली आहे. मात्र खेळाडू त्यापूर्वीही आपापल्या आयपीएल संघात दाखल होऊ शकतात.
तंबाखू, मद्यसंबंधित जाहिराती टाळण्याचे आदेश
आयपीएल दरम्यान तंबाखू आणि मद्यपानाशी निगडित जाहिरात करणे टाळावे, असे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. यासंबंधी आरोग्य मंत्रालयाने आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांना पत्र दिले आहे. “स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही खेळाडूने अथवा संघाने जाणते-अजाणतेपणी तंबाखू अथवा मद्याशी निगडित जाहिराती करू नयेत. खेळाडू हे युवा पिढीचे आदर्श असतात. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या संघांनी याची काळजी राखावी,” असे आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.
मॅथ्यू वेड गुजरातचा सहाय्यक प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फलंदाज मॅथ्यू वेडची गुजरात टायटन्स संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. २०२२ ते २०२४ या तीन हंगामांमध्ये ३७ वर्षीय वेड गुजरातकडून खेळला. मात्र २०२४च्या अखेरीस त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याला लिलावातही कोणी खरेदी केले नाही. नुकताच वेडचा समावेश असलेल्या होबार्ट हरिकेन्स संघाने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचे विजेतेपद मिळवले. आता आगामी आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला वेड मार्गदर्शन करताना दिसेल.
ब्रूकची पुन्हा माघार; दोन वर्षांच्या निलंबनाची शक्यता
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने भविष्यातील आंतरराष्ट्रीय मालिकांचा विचार करता आगामी आयपीएलमधून माघार घेतली आहे. मात्र यामुळे त्याच्यावर दोन वर्षांचे निलंबन येऊ शकते.
२६ वर्षीय ब्रूकला दिल्लीने नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात ६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांची एकदिवसीय व टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर २० जूनपासून भारत-इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका केळवण्यात येईल. जोस बटलरच्या राजीनाम्यानंतर ब्रूककडे इंग्लंडच्या एकदिवसीय व टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ब्रूकने आयपीएलमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. गतवर्षीसुद्धा आजीचे निधन झाल्याने ब्रूकने आयपीएलमधून माघार घेतली होती. २०२३मध्ये तो हैदराबादकडून अखेरची आयपीएल खेळला. आयपीएलच्या प्रशासकीय समितीने यंदाच्या लिलावापूर्वी नवी नियमावली लागू केली. त्यानुसार एखाद्या विदेशी खेळाडूने लिलावात नाव नोंदवून स्पर्धेपूर्वी माघार घेतली, तर त्याला पुढील दोन वर्षांसाठी आयपीएल खेळण्यास मनाई असेल. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते.