Twitter
क्रीडा

Vinesh Phogat: विनेशची तिहेरी दंगल! एकाच दिवशी तिघांना धुतलं; थाटात फायनलमध्ये धडक

Paris Olympics 2024: भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी ऐतिहासिक दंगल घडवली. महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती तसेज जगज्जेती आणि जपानची अग्रमानांकित युई सुसाकीला धूळ चारली.

Swapnil S

पॅरिस : भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी ऐतिहासिक दंगल घडवली. महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने पहिल्याच फेरीत टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती तसेज जगज्जेती आणि जपानची अग्रमानांकित युई सुसाकीला धूळ चारली. त्यानंतर उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतही विनेशने धडाकेबाज विजयाची नोंद करताना थाटात अंतिम फेरीत धडक मारली.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे विनेशसह भारताच्या तारांकित कुस्तीपटूंनी काही महिन्यांपूर्वी जंतरमंतर येथे आंदोलन केले. त्यानंतर २९ वर्षीय विनेशला जागतिक स्पर्धेतही पदक जिंकता आले नाही. इतकेच नव्हे तर तिला ५३ किलो वजनी गटातून काढत ५० किलो गटात खेळण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एकंदर गेल्या वर्षभरापासून विनेश विविध कारणांनी चर्चेत आहे. मात्र या नकारात्मक बाबींचा परिणाम होऊ न देता विनेशने ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकवून देण्याच्या दिशेने कूच केली आहे.

मंगळवारी आपल्या अभियानाला प्रारंभ करताना विनेशसमोर उपउपांत्यपूर्व लढतीत जपानचा अग्रमानांकित सुसाकीचे कडवे आव्हान होते. सर्वांनी विनेश ही लढत जिंकणे कठीण असल्याचे आधीच स्पष्ट केले. मुख्य म्हणजे सुसाकी ही आपल्या कारकीर्दीत सलग ८२ सामन्यांपासून अपराजित होती. टोकियोतील सुवर्णपदकासह तिने जागतिक सुवर्णही पटकावलेले आहे. एकदाही तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेली नाही. मात्र विनेशने तिची ही विजय मालिका संपुष्टात आणली.

लढतीत अनेकदा पिछाडीवर असूनही अखेरच्या ९ सेकंदात विनेशने कामगिरी उंचावून सुसाकीवर ३-२ अशी मात केली. त्यानंतर अटीतटीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाच हिचा ७-५ असा पाडाव करत विनेशने पदकाच्या दिशेने झेप घेतली. उपांत्य फेरीत विनेशपुढे कुबाच्या युस्नेल गुझमनचे आव्हान होते. मात्र विनेशने तिलाही ५-० असे सहज पराभूत केले आणि भारताकडून अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरण्याचा ऐतिहासिक मान मिळवला.

विनेश तू वाघीण आहेस : बजरंग

“विनेश तू भारताची वाघीण आहेस. लागोपाठच्या दोन लढतींमध्ये ऑलिम्पिक विजेती आणि माजी जगज्जेतीला नमवणे सोपे नाही. अवघा भारत देश तुझ्या पाठीशी असून विनेश तू पदक जिंकूनच मायदेशी परतशील, याची मला खात्री आहे,” अशा शब्दांत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशचे कौतुक केले. विनेशसह बजरंगनेही आंदोलनात सहभाग दर्शवला होता. तो यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही.

विनेशला भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी महिला कुस्तीपटू ठरण्याचा मान मिळाला. २०१६मध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकले होते.

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

बिहारमध्ये 'अब की बार भी' रालोआ सरकार; २४३ पैकी २०२ जागा जिंकून महाविजय; महाआघाडीला केवळ ३५ जागा

Navle Bridge Accident : पुणे अपघातप्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधानसभा पोटनिवडणुकीत संमिश्र निकाल; काँग्रेसला राजस्थान, तेलंगणात यश

Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरचे घर स्फोटाद्वारे उडवले