क्रीडा

Women's World Cup: भारतीय महिलांचा विजयारंभ; रविवारी पाकिस्तानशी गाठ

आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात...

Swapnil S

गुवाहाटी : अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्माने (५३ धावा आणि ३ बळी) केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार विजयारंभ केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने सलामीच्या लढतीत सहयजमान श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. अमनजोत कौर (५७ धावा, १ बळी), स्नेह राणा (नाबाद २८ धावा, २ बळी) यांनीही भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता रविवारी भारताची पाकिस्तानशी गाठ पडेल.

गुवाहाटीच्या बारस्परा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकांत ८ बाद २६९ अशी धावसंख्या उभारली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला. त्यानंतर श्रीलंकेपुढे डकवर्थ लेविस नियमानुसार २७१ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र त्यांचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांत गारद झाला. दीप्तीने कर्णधार चामरी अटापटूसह (४३) कविशा दिलहारी (१५) व अनुष्का संजीवनी (६) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. राणा व श्री चरिणी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत दीप्तीला सुरेख साथ दिली.

भारतात ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या काळात महिलांच्या विश्वचषकाचे १३वे पर्व रंगणार असून या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तानचा संघ आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतात येणार नसल्याने त्यांच्या लढती कोलंबोत होतील. आतापर्यंत महिलांचे १२ एकदिवसीय विश्वचषक झाले आहेत. त्यांपैकी भारताने २००५ व २०१७ या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुख्य म्हणजे गेल्या विश्वचषकात (२०२२) भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नव्हती. यावेळी महिला संघ जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाला (८) चौथ्याच षटकात गमावले. त्यानंतर प्रतिका रावल (३७) व हरलीन देओल (४८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भर घातली. प्रतिका बाद झाल्यावर फिरकीपटू रणवीराने एकाच षटकात हरलीन, हरमनप्रीत (२१) व जेमिमा रॉड्रिग्ज (०) यांचे अडसर दूर केले.

६ बाद १२४ अशा स्थितीतून अमनजोत व दीप्तीने सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली. अमनजोतने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले, तर दीप्तीने १६वे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे भारताने अडीचशे धावांचा पल्ला गाठला.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल