मुंबई-बंगळुरू लढतीने प्रारंभ! WPL चे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबई, बडोदा येथे सामन्यांचे आयोजन Photo- X
क्रीडा

मुंबई-बंगळुरू लढतीने प्रारंभ! WPLचे वेळापत्रक जाहीर; नवी मुंबई, बडोदा येथे सामन्यांचे आयोजन

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील लढतीने होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) डब्ल्यूपीएलचे वेळापत्रक तसेच स्पर्धेच्या आयोजनाची ठिकाणे गुरुवारी जाहीर करण्यात आली. ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या चौथ्या पर्वाचा प्रारंभ गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील लढतीने होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) डब्ल्यूपीएलचे वेळापत्रक तसेच स्पर्धेच्या आयोजनाची ठिकाणे गुरुवारी जाहीर करण्यात आली. ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

भारतीय महिला संघासाठी लकी ठरलेल्या नवी मुंबईतील ऐतिहासिक डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर दोन टप्प्यांत सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. यंदा प्रथमच अंतिम सामना आठवड्याच्या अखेरीस न ठेवता मधल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी) ठेवण्यात आला आहे. कारण या स्पर्धेच्या दोन दिवसांनंतर लगेच भारतात ७ फेब्रुवारीपासून पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. १ फेब्रुवारीला साखळी सामने संपतील, ३ तारखेला मग एलिमिनेटरची लढत होईल. ५ तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. डब्ल्यूपीएलचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी स्पर्धेचे वेळापत्रक, तारखा व ठिकाणांची घोषणा केली.

आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला, तर एकदा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महाअंतिम लढत रंगली. यंदा मात्र महिला क्रिकेटसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला प्राधान्य दिले आहे. तर बाद फेरीसह अंतिम लढतीच्या आयोजनाचा मान बडोद्याला मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, बंगळुरू, यूपी, गुजरात व दिल्ली या पाच संघांचा स्पर्धेत समावेश असेल.

नोव्हेंबरमध्येच डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (लिलाव) पार पडले. पुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच महिलांमध्येही दर तीन वर्षांनी मेगा ऑक्शन करवण्यात येणार आहे. लिलावापूर्वी सर्व खेळाडूंनी प्रत्येकी ४-५ खेळाडू कायम राखले होते. प्रत्येक संघाला किमान १५ ते कमाल १८ खेळाडू संघात घेण्याची मुभा होती. त्यांपैकी मुंबई, बंगळुरू व दिल्लीने प्रत्येकी १६, तर यूपी व गुजरात यांनी १८ खेळाडू खरेदी केले.

विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली दीप्ती शर्मा यंदाच्या लिलावात सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. तिला यूपी वॉरियर्सने ३.२० कोटी रुपयांत खरेदी केले. त्याशिवाय न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया कर (३ कोटी), वेगवान गोलंदाज शिखा पांडे (२.४० कोटी) या खेळाडूंना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची बोली लागली. अमेलियाला मुंबई इंडियन्सने, तर शिखाला यूपीने ताफ्यात घेतले.

दरम्यान, डी. वाय. पाटील स्टेडियम हे गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाचे घरचे तसेच हक्काचे मैदान म्हणून उदयास आले आहे. येथे आंतरराष्ट्रीय तसेच डब्ल्यूपीएलच्या सामन्यांनाही उदंड प्रतिसाद लाभतो. त्यातच भारतीय महिला संघाने येथेच प्रथम विश्वचषक उंचावल्याने आता जानेवारीत रंगणाऱ्या डब्ल्यूपीएलला चाहते गर्दी करतील, यात शंका नाही.

२०२४च्या डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईने अंतिम फेरीत दिल्लीला नमवून दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली होती. ब्रेबॉर्न स्टेडियमवर ही लढत पार पडलेली. त्यामुळे यंदा मुंबईला पहिल्या लढतीचा मान देण्यात आला आहे.

२ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय संघ विश्रांतीवर आहे. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

तिकिटांचा दर वाढणार

डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामासाठी तिकिटांचा दर वाढणार असल्याचे समजते. पहिल्या हंगामात महिलांना डब्ल्यूपीएलसाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता, तर पुरुषांसाठी १०० रुपयांचे एक तिकीट होते. मात्र आता सर्वांना प्रत्येकी ५०० रुपयांपासून तिकीट सुरू होण्याची दाट शक्यता आहे. २ ते ३ हजारांपर्यंत तिकिटांचा दर वाढणार आहे. महिला क्रिकेटला चाहत्यांचा लाभणारा वाढता प्रतिसाद व विश्वचषकामुळे मिळालेल्या ग्लॅमरचा हा प्रभाव असल्याचे समजते. डबल हेडरच्या दिवशी दुपारपासूनच चाहते गर्दी करण्याची शक्यता आहे. तसेच नवी मुंबईतील स्टेडियममध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मोफत पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

यंदाच्या हंगामात हे प्रथमच

  • यंदाच्या स्पर्धेत प्रथमच दोन शनिवारी प्रत्येकी दोन लढतींचे आयोजन करण्यात येईल. १० जानेवारीला यूपी-गुजरात, मुंबई-दिल्ली नवी मुंबईत खेळतील. त्यानंतर १७ जानेवारीच्या शनिवारी मुंबई-यूपी, दिल्ली-बंगळुरू यांच्यात लढती होतील. स्पर्धेच्या इतिहासात आजवर कधीच शनिवार अथवा रविवारी दोन-दोन सामने झाले नव्हते. दुपारचे सामने ३.३० वाजता, तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील.

  • यावेळी प्रथमच स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार किंवा रविवारी न होता गुरुवारी खेळवण्यात येईल. तसेच प्रथमच स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपणार आहे. यापूर्वी तीन हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन मार्चच्या १५ तारखेपर्यंत लांबायचे. मात्र भारतात होणारा पुरुषांचा आयसीसी विश्वचषक, आयपीएल या स्पर्धांमुळे डब्ल्यूपीएल जानेवारीत सुरू होणार आहे.

श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका

श्रीलंका महिला संघ डिसेंबरच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये ५ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. लवकरच भारतीय महिला संघाची यासाठी घोषणा केली जाईल. २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत हे पाच सामने होतील. २१ व २३ तारखेला विशाखापट्टणम येथे, तर २६, २८ व ३० डिसेंबरच्या लढती तिरुवनंतपुरम येथे होतील. तसेच डब्ल्यूपीएलनंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल. त्यामध्ये ३ टी-२०, ३ एकदिवसीय व १ कसोटी सामन्याचा समावेश आहे. त्यामुळे एकूणच विश्वचषक विजयानंतर विश्रांतीवर असलेल्या भारतीय संघासाठी पुढील २-३ महिने क्रिकेटने व्यग्र असतील.

पीएम मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युक्रेन संघर्षावर महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'भारत-रशिया मैत्री अढळ'

महायुती सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा रिपोर्ट कार्ड, बावनकुळे म्हणाले, "महाराष्ट्र आता...

IndiGo एअरलाइन्सचा माफीनामा; प्रवाशांसाठी हॉटेल-रिफंड सुविधा, “आम्ही लवकरच....

Mahaparinirvan Din 2025 : जीवनाला कलाटणी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, 'जो समाज शिक्षणापासून...

राज्यातील निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरलाच; मतमोजणीवर 'सर्वोच्च' आदेश