ठाणे

‘आपला दवाखाना’ योजनेचा बोजवारा; ठाण्यात ४० केंद्रे बंद, ६ महीने कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला!

नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आता कोलमडली आहे. एकेकाळी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी उचलणारी ही केंद्रे आता बंद पडल्याने, ठाण्यातील आरोग्यसेवेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेहा जाधव - तांबे

नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना आता कोलमडली आहे. एकेकाळी नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी उचलणारी ही केंद्रे आता बंद पडल्याने, ठाण्यातील आरोग्यसेवेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने शहरभर सुरू केलेल्या ५० केंद्रांपैकी तब्बल ४० दवाखाने बंद झाले असून, काही ठिकाणी या बंद केंद्रांचे रूपांतर व्यापारी आस्थापनांत झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका ठिकाणी तर दवाखान्याचे साडीच्या दुकानात रूपांतर झाल्याने नागरिक आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.

लोकसंख्या वाढली, आरोग्यसेवा कोलमडली

ठाण्याची लोकसंख्या तब्बल २६ लाखांवर पोहोचली असून, त्यातील ५२ टक्क्यांहून अधिक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळीत राहतात. आरोग्य नियमांनुसार, दर ३० ते ४० हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र आवश्यक असते. मात्र, सध्या ठाण्यात एक आरोग्य केंद्र दीड लाख लोकांची सेवा करत आहे.

ही तफावत भरून काढण्यासाठी ‘आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचे संचालन बंगळुरूमधील ‘मेडऑनगो’ (MedOnGo) या खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले होते. प्रत्येक रुग्णावर १५० रुपये मोबदला या कंपनीला दिला जात होता.

कंपनीचा करार संपण्यापूर्वीच केंद्रे बंद

या योजनेचा करार ऑक्टोबर २०२५ पर्यंत असतानाही, ऑगस्ट महिन्यातच सर्व केंद्रे अचानक बंद करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मागील ६ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ‘ जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात नागरिक आणि माजी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. परिचारिका आणि कर्मचारी यांनी कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा पर्दाफाश करत तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.

थकित वेतन वसूल करण्याची मागणी

आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर आणि कंपनीवर दोन्हीवर टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले, कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत आणि पालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने ‘मेडऑनगो’वर ५६ लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचा दावा केला आहे; परंतु अद्याप या कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रशासनाने ही रक्कम वसूल करून कर्मचाऱ्यांचे थकित पगार तत्काळ द्यावेत. अन्यथा आम्ही महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढू.

महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या धोरणांवर थेट टीका करताना सांगितले, “महापालिका ही प्रयोगशाळा नाही की इच्छेनुसार योजना सुरू आणि बंद केल्या जातील. नागरिकांना प्रतीकात्मक नव्हे तर स्थिर आणि विश्वासार्ह आरोग्यव्यवस्था हवी आहे.” ते पुढे म्हणाले, “काही ठिकाणी बंद दवाखान्यांचे व्यापारी आस्थापनात रूपांतर झाले आहे. एका ठिकाणी तर साडीचे दुकान सुरू झाले आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर ही जागा कायमस्वरूपी खाजगी स्वार्थाच्या ताब्यात जाऊ शकते.”

महापालिकेचे मौन कायम

या सर्व घडामोडींवर ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. ‘आपला दवाखाना’ योजनेचे भवितव्य, कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आणि आरोग्यसेवा पुन्हा सुरू होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना अजूनही मिळालेली नाहीत. दरम्यान, ठाण्यातील नागरिकांकडून या योजनेच्या पुनरुज्जीवनाची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी केली जात आहे.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हातावर वेदना...

ऐन दिवाळीत मुलाचा अपघाती मृत्यू; पण पालकांचा उदात्त निर्णय; सत्यम दुबे ठरला वसईतील सर्वात तरुण अवयवदाता!

बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलिस कोठडी

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी प्रशांत बनकर अटकेत, पोलिस उपनिरीक्षक अजूनही फरार