ठाणे

म्हाडाविरोधात आंदोलन छेडणार; ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा इशारा

कोपरी-पाचपाखाडी, सावरकरनगर, शिवाईनगर, वर्तकनगर, वसंत विहार या विभागात म्हाडाच्या इमारती आणि राखीव भूखंड आहेत.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील म्हाडा अभिन्यासातील जुन्या वसाहतींची पुनर्बांधणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. स्थानिक मराठी माणसांवर दबाव आणून त्यांची फसवणूक केली जात आहे. संघटीत गुन्हेगार, ठाणे महापालिका, म्हाडा, मंत्रालयातील अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिला.

कोपरी-पाचपाखाडी, सावरकरनगर, शिवाईनगर, वर्तकनगर, वसंत विहार या विभागात म्हाडाच्या इमारती आणि राखीव भूखंड आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करताना राजकीय पुढारी आणि विकासक संगनमत करून एकत्र आले आहेत. मात्र पुनर्विकास करतांना म्हाडाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. म्हाडा प्राधिकरणाची वर्तकनगर येथे १६ एकर जमीन आहे. त्यावर ७२ इमारती आणि १९ बैठी चाळी आहेत. ठाणे महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी १९९० च्या दशकात विकास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हा येथे डीपी रोड, अंतर्गत रस्ते, शाळांसाठी राखीव भूखंड, सुविधा भूखंड, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, रेशनिंग दुकान यासाठी राखीव भूखंड ठेवण्यात आलेले आहेत. मात्र या भूखंडांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.

म्हाडातील अधिकारी, राजकीय पुढारी आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार सुरू असून या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना लेखी निवेदन देण्यात आले असून अतिक्रमणे काढणे, रहिवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे या अटीशर्तींची पूर्तता करण्याची मागणी निवेदनात करण्यात आल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

२००९ साली पुन्हा विकास प्रस्ताव नव्याने आणला गेला व अडीच एफएसआय या भागाला देण्यात आला. वाढीव एफएसआय या भागाला मिळाल्याने सर्व सोयी-सुविधा वाढविण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मी केल्यानंतर अटीशर्तीच्या आधारे वाढीव एफएसआय मंजूर करण्यात आला. मात्र येथील इमारतींची पुनर्बांधणी करताना गुंडांचा विकासक म्हणून शिरकाव झाला आणि पुनर्बांधणी रखडली. मात्र आता पुनर्बांधणी करताना पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या गेलेल्या नाहीत. सुविधा भूखंड, सोयी-सुविधा, क्रीडांगणे चोरीला गेलेली आहेत. म्हाडाच्या इमारतीचा एकत्र विकास करू नये, असे असताना दबावाखाली एकत्रितपणे पुनर्बांधणी केली जात आहे. म्हाडामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असल्याने हे घडत आहे. - विक्रांत चव्हाण, माजी नगरसेवक

उपोषण करण्याचा इशारा

वर्तकनगर येथे खोटी कागदपत्रे सादर करून एफएसआयचीही चोरी झालेली आहे. म्हाडाचा एक भूखंड कोणतीही निविदा न काढता एका व्यक्तीला दिला गेलेला आहे. एका विकासकाने ४५ आणि ४७ या दोन इमारतींची एकत्र पुनर्बांधणी करतांना वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. त्याला वाचविण्यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. त्याने गटारे खोदली आहेत, झाडे तोडली आहेत. त्याचा विकास प्रस्ताव ठाणे महापालिकेने फेटाळला आहे तरी हुकूमशाहीच्या जोरावर तो इमारत बांधण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून नागरिकांना एकत्रित सुविधा मिळाव्यात, योग्य चौरस फूट घर मिळावे, म्हाडातील कामकाज भ्रष्टाचार मुक्त व्हावे, यासाठी उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.

BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

Unnao rape case : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तुरुंगातच राहणार माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर; जामिनाला स्थगिती

Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?

कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी वाढणार! IRCTC ने नियमात आजपासून केला ‘हा’ बदल