मुंबई : बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या शाळेचे अध्यक्ष आणि सचिवाला उच्च न्यायालयाने मंगळवारी झटका दिला. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना मुलींवरील लैंगिक अत्याचाराची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्या प्रकाराबाबत तातडीने पोलिसांना कळवायला हवे होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
याप्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार घटनेची त्वरित पोलिसांना तक्रार न दिल्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने सुरुवातीला सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
आरोपींना मुलींवरील लैंगिक अत्याचाराची कल्पना होती
या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपींना मुलींवरील लैंगिक अत्याचाराची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्या प्रकाराबाबत तातडीने पोलिसांना कळवायला हवे होते, असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
एकीकडे द्विसदस्यीय खंडपीठाने या दोघांच्या अटकेबाबत पोलिसांना फटकारल्यानंतर दुसरीकडे एकलपीठाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्याने दोन्ही ट्रस्टींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.