ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येचे शहर असलेल्या दिवा शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढू लागली आहे. साधारण दिवा शहराची चार ते पाच लाखांच्या आसपास लोकसंख्या झाल्याने वाहनांची वर्दळ देखील वाढू लागली आहे. परिणामी दिवा शहरात वाहतूककोंडी वाढू लागली असल्याने याचा फटका अनेकदा मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीला पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा दिवा रेल्वे स्थानकाजवळ पूर्व-पश्चिम जाण्यास रेल्वे फाटकाजवळ वाहतूककोंडी होते, तर साबेगावाकडे येणाऱ्या -जाणाऱ्या दिवा रेल्वे फाटकाजवळून जावे लागते. परिणामी रेल्वे फाटक उघडले गेल्यास वाहतूककोंडीमुळे लवकर बंद करण्यास रेल्वे सुरक्षा बलास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रेल्वे फाटक अनेकवेळा वेळेपेक्षा जास्त काळ बंद वा सुरू राहते. याचाच फटका मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर होताना दिसत आहे.
दिवा रेल्वे स्थानकाचे रेल्वे फाटक कायम स्वरूपी बंद करण्यासाठी ३ मार्च २०१९ मध्ये भूमिपूजन झालेले उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. परंतु पुलाचे काम २०२४ उजाडूनही संथ गतीने सुरू असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद होऊ शकले नाही, याचाच फटका मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असल्याचे दिसून येत आहे.