ठाणे

डोंबिवलीत १५ वर्षांनी नकोशी पुनरावृत्ती! दोघीही एअर होस्टेस, एकच शहर, एकच स्वप्न; पण...

गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या 'एआय-१७१' भीषण विमान अपघातात डोंबिवलीची तरुणी रोशनी सोनघरे या एअर होस्टेसचा मृत्यू झाला. या घटनेने डोंबिवलीकरांच्या १५ वर्षांच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. १५ वर्षांपूर्वी २०१० साली मंगळुरू येथे झालेल्या विमान अपघातात देखील डोंबिवलीमधीलच एअर होस्टेस तेजल कामुलकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

नेहा जाधव - तांबे

गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या 'एआय-१७१' भीषण विमान अपघातात डोंबिवलीची तरुणी रोशनी सोनघरे या एअर होस्टेसचा मृत्यू झाला. या घटनेने डोंबिवलीकरांच्या १५ वर्षांच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. १५ वर्षांपूर्वी २०१० साली मंगळुरू येथे झालेल्या विमान अपघातात देखील डोंबिवलीमधीलच एअर होस्टेस तेजल कामुलकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रोशनी आणि तेजल या दोघींनीही आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, विमान अपघातात या दोघींच्याही स्वप्नांची राख झाली. डोंबिवलीमध्ये १५ वर्षांनी अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे.

२२ मे २०१० रोजी दुबईहून मंगळुरूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट ८१२ मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना कोसळले. हे विमान पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीवरून घसरून एका दरीत कोसळले. या अपघातात विमानातील १६६ जणांपैकी १५८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये डोंबिवलीची एअर होस्टेस तेजल कामुलकरचाही मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला होता.

स्वच्छंदी पक्षाप्रमाणे हवेत उडण्याचे तेजलचे स्वप्न -

तेजल ही डोंबिवलीमध्ये तुकाराम नगर येथील सौभाग्य इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती. 'वन इंडिया'ने २०१० साली प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, एका स्वच्छंदी पक्षाप्रमाणे हवेत उडण्याचे तेजलचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये (IATA) एअर होस्टेस प्रशिक्षणाचा डिप्लोमा कोर्स केला. तिचा स्वभाव मनमिळावू होता. फक्त चार महिन्यांपूर्वी ती एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. मंगळुरू दुर्घटनेच्या दोन आठवड्याआधी तिने वयाची पंचविशी पूर्ण केली होती. यावेळी तिने मोठ्या पार्टीचेही आयोजन केले होते. तिचा हा वाढदिवस शेवटचा ठरला.

१० बाय १० च्या खोलीतून रोशनीच्या स्वप्नांची सुरुवात -

तर, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेने देखील लहान वयातच उडण्याचे स्वप्न पाहिले होते. तेजलसारखेच तिलाही उंच आकाशात स्वच्छंदी झेप घ्यायची होती. त्यासाठी तिने अगदी १० बाय १० च्या खोलीतून सुरुवात केली. आई, वडील आणि भाऊ असे तिचे लहान कुटुंब. सोनघरे मूळचे रत्नागिरी येथील मंडणगडचे. मुंबईत ते ग्रँट रोड येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी डोंबिवली येथे स्थलांतर केले होते.

रोशनीचे वडील टेक्निशियन आहेत. त्यामुळे मिळेल ते काम करून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या दोन्ही मुलांची स्वप्ने पूर्ण केली. रोशनीचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो.

रोशनीचे शालेय शिक्षण मुंबईतील सरस्वती इंग्लिश माध्यमाच्या शाळेत झाले. तर, तिने भारत कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने अंधेरी येथून खासगी संस्थेतून एअर होस्टेसचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर तिने २०२१ मध्ये स्पाइस जेटमध्ये नोकरी केली. दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर इंडियामध्ये रुजू झाली होती.

रोशनीचे Instagram वर 'स्काय लव्हर हर' या नावाने अकाऊंट आहे. तिचे ५४ हजार 'फॉलोवर्स' आहेत. ती वेगवेगळे व्हिडिओ देखील Instagram वर शेअर करत असे.

रोशनीच्या मामाने माध्यमांना सांगितले, की ती दोन दिवसांपूर्वी आपल्या आई वडिलांना भेटायला गावी गेली आणि डोंबिवलीत परतल्यावर लगेचच तिला लंडनला जाण्याची फ्लाइट लागली. लंडनसाठी रोशनी घराबाहेर पडली आणि परतलीच नाही.

एकाच शहरातून आकाशात भरारी घेणाऱ्या या दोन तरुणींनी अपघातात प्राण गमावल्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा