कल्याणच्या मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन 
ठाणे

थोडा आगे हो! लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद; चार-पाच जणांनी केली मारहाण, कल्याणच्या मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन

डोंबिवली-ठाणे दरम्यान हिंदीत बोलल्याचा राग काढत टोळक्याने मारहाण केल्याच्या मानसिक धक्क्यातून १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेहा जाधव - तांबे

मुंबई-ठाण्यातील लोकलमध्ये मराठी-हिंदी भाषिक खटके आता उफाळून जीवघेण्या स्वरूपात समोर येत आहेत. अशातच भाषावादाची एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली-ठाणे दरम्यान हिंदीत बोलल्याचा राग काढत टोळक्याने मारहाण केल्याच्या मानसिक धक्क्यातून १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

थोडा आगे हो बोलणं जीवावर बेतलं

कल्याण पूर्व तिसगाव नाका येथे राहणारा अर्णव खैरे मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. गर्दीच्या डब्यात अर्णवने इतरांना बाजूला होण्यासाठी सहज हिंदीत “थोडा आगे हो…” असे म्हटले. एवढ्यावरून काही अनोळखी प्रवाशांनी त्याला घेरले. “मराठी बोलता येत नाही का?”, “मराठी बोलण्याची लाज वाटते का?” अशा उलटसुलट सवालांनंतर त्याला बेदम मारहाण केली.

अपमानाने भयंकर नैराश्य

अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेला अर्णव पुढच्या ठाणे स्टेशनला उतरला, भावनिकदृष्ट्या कोसळलेला तो मागील लोकल पकडून मुलुंडला पोहोचला. त्याने कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पूर्ण केले, पण मनात खोलवर बसलेला अपमान आणि भीती त्याला स्वाभाविक राहू देईना. दुपारी तो घरी परतला आणि वडिलांना फोन करून त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला.

सायंकाळी ७ वाजता वडील जितेंद्र खैरे घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुग्णालयात नेले असता रात्री ०९.०५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडिलांच्या तक्रारीनुसार कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

अर्णवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. लोकलमधील अपघात, भांडणे आणि वाद वारंवार घडत असले तरी भाषावादातून झालेल्या मारहाणीपुढे एका विद्यार्थ्याचा जीव जाणे, ही धक्कादायक आणि चिंताजनक बाब आहे.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"