भाईंंदर : मीरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या निवेदनानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंटेनर शाखांवर कारवाईस स्थगिती दिली असताना दुसरीकडे महापालिकेने मात्र भाजप व अन्य पक्षांच्या मागणीनंतर रस्ते-पदपथावरील ९ कंटेनर शाखा हटवल्या. पालिकेच्या कारवाईसोबतच शिंदे गटाने देखील स्वतःहून ७ कंटेनर शाखा काढून घेतल्या आहे.
शिंदे गटाच्या कंटेनर शाखांविरोधात भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर भाजपचे कंटेनर कार्यालय थाटले. पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणेसह अनेक शासकीय कार्यालयांबाहेर कंटेनरच्या माध्यमातून कार्यालये थाटण्याचा इशारा मेहतांनी दिला. मेहतांच्या आक्रमक पावित्र्यानंतर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार रस्ते-पदपथवरील कंटेनर कार्यालयांप्रकरणी राजकीय पक्षांना नोटीस देण्यात आल्या.
शिंदे गटाने देखील आक्रमक होत थेट आ. मेहतां विरुद्ध लेखी तक्रार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. शिवसेनेच्या विकासकामांमुळे धाबे दणाणलेल्या आ. मेहतांनी शाखांवर कारवाईची मागणी करत आयुक्तांवर दबाव टाकला आहे. मात्र आ. मेहतांच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांची पोलखोल होणे गरजेचे असून अनेक सुविधा व आरक्षित भूखंड तसेच जागा महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे भासवून मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने टिडीआर लाटलेला आहे.
मीरा - भाईंदरमध्ये अनधिकृतरीत्या खाऊगल्या वसविण्यात आल्या. फुटपाथवर व रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले बसवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे. पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर स्वतःची कार्यालये उभारण्यात आली आहेत. पालिकेच्या अनेक प्रकल्पात मधुसुदन पुरोहितसारख्या चेल्यांना बेकायदेशीररीत्या कामे दण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे १० वर्षाच्या ग्रंथ मुथा या बालकाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे आरोप जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी तक्रारीत केले. मात्र महापालिकेने शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर कारवाई सुरू करत रस्ते- पदपथवरील आतापर्यंत ९ कंटेनर शाखा उचलल्या आहेत.
पालिकेच्या कारवाईने शिंदे गटाने देखील ७ शाखा स्वतःहून काढून घेतल्या आहेत. महापालिकेच्या कारवाईचे भाजपसह अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची स्थगिती
पालिकेच्या नोटीसची मुदत संपण्याआधी भाजपने आयुक्त बंगल्याबाहेरील कंटेनर कार्यालय काढून घेतले, तर शिंदेसनेने कंटेनर शाखा काढून घेण्यसाठी १५ दिवसांची मुदत मागितली होती. दुसरीकडे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांच्या निवेदनावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कंटेनर शाखा काढण्यास स्थगितीचे आदेश प्रधान सचिवांना देत त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले.