ठाणे

अनधिकृत बांधकामाविरोधात महानगरपालिका आक्रमक; कळवा, मुंब्रा आणि दिवा भागावर विशेष भर

Swapnil S

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम १० जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात सलगपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार असली तरी त्याचा विशेष भर कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागावर राहणार आहे.

शहरात कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू होऊ नये, यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी स्वतः लक्ष ठेवावे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील मोहिमांचे संनियंत्रण सहाय्यक आयुक्त करतील. आवश्यकतेप्रमाणे त्यांना अतिरिक्त अधिकाऱ्यांची कुमकही देण्यात येईल. अनधिकृत प्लिंथ (जोत्याचे बांधकाम) तात्काळ तोडण्यात यावे, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे. पुन्हा त्याच ठिकाणी प्लिंथचे काम झाले तर जमीन मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. जमीन सरकारी मालकीची असेल तर बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच, एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, असेही आयुक्तांनी सांगितले. बांधकामाच्या ठिकाणी बोअरवेल केली असेल तर ती तोडावी आणि त्यात दगड टाकून ती बोअरवेल कायमस्वरूपी बुजवावी. तसेच, तोडकामाचा सगळा खर्च हा जमीन मालकाकडून, त्याच्या मालमत्ता करात थकबाकी म्हणून वसूल करावा. डिमांड नोटीस काढून तो खर्च वसूल केला जावा, असेही आयुक्तांनी निर्देश दिले.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्री यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. अनधिकृत बांधकाम म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेलाही मोठा धोका असतो. त्यामुळे, आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाचा आढावा घेऊन तोडकामाचा कृती आराखडा तयार करावा. स्वतः साइटवर उभे राहून तोडकाम करून घ्यावे, असे आयुक्त बांगर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले. कारवाई करताना अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वागावे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन ही कारवाई सुरू असल्याचे सांगावे. अनधिकृत इमारतीवरील कारवाई करताना पूर्ण बांधकाम जमीनदोस्त झाले पाहिजे. पूर्णपणे सुरक्षित वातावरणात ही कारवाई झाली पाहिजे. सहाय्यक आयुक्त किंवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच तोडकाम कारवाई झाली पाहिजे, असेही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

कारवाईसाठी ज्यादा सुरक्षा बळ

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या १०० जवानांची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. हे जवान शारीरिकदृष्ट्या सक्षम असतील आणि त्यात महिला व पुरुषांचे प्रमाण आवश्यकतेनुसार असेल, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. सध्या तोडकाम करण्यासाठी एकच ठेकेदार आहे. मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करायची असल्याने जास्त ठेकेदार लागणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांना धडक मोहीम राबविण्यासाठी अतिक्रमण विभागाने पूर्ण पाठबळ द्यावे. आवश्यक असेल तिथे इमारत तोडकाम तज्ज्ञांची मदत घ्यावी. पाच मजल्यापेक्षा जास्त मोठे बांधकाम तोडण्यासाठी विशेष यंत्रणा, यंत्र सामुग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच, एका प्रभाग समिती क्षेत्रात एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जावी. रविवार वगळता सर्व दिवशी ही कारवाई होईल. त्याला सार्वजनिक सुट्टीच्या दिवसाचाही अपवाद असणार नाही.

- अभिजीत बांगर, आयुक्त ठाणे महापालिका

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त