ठाणे

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस ५० टक्केच पाणीपुरवठा होणार

ठाणेकरांना केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, पाणी जपून वापरण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.

Swapnil S

ठाणे : भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. परिणामी पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा जवळपास ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेने देखील यापूर्वीच १० टक्के पाणी कपात लागू केली. ठाणेकरांना केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून, पाणी जपून वापरण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे.

शहापूर, भिवंडी या तालुक्यांना पावसानाने अक्षरशः झोडपून काढले असून, शहापूरमध्ये, तर मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. भातसा धरण क्षेत्रात ठाणे महापालिकेचे पिसे पम्पिंग स्टेशन असून, शहाड येथे स्टेम प्राधिकरणाचे पम्पिंग स्टेशन आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. याच पम्पिंग स्टेशनमधून संपूर्ण ठाण्याला पाणीपुरवठा होत असून, नदीपात्रात गाळ अडकल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

दोन्ही पम्पिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र, पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात १० आणि ११ जुलै रोजी अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. हा अनियमित पाणीपुरवठा ४० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याने ठाणेकरांना पुढचे तीन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महापालिकेने देखील पाणी जपून वापरण्याचे आवाहन संपूर्ण ठाणेकरांना केले आहे.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

मराठा GR मुळे किती जणांना मिळाले प्रमाणपत्र? राधाकृष्ण विखे-पाटलांना घेराव

पाटोळे लाच प्रकरणात तक्रारदारांना धमकी; ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'तो' GR रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची; विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

पुन्हा एकदा भर न्यायालयात बूटहल्ला