ठाणे

ग्रामीण भागात पळसाचे घोंगडे दुर्मिळ !

पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक साहित्यांपैकी पळसाच्या पानाचे पान घोंगडे यांनाही तितकेच महत्त्व आहे.

Swapnil S

दीपक गायकवाड /मोखाडा

पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक साहित्यांपैकी पळसाच्या पानाचे पान घोंगडे यांनाही तितकेच महत्त्व आहे. याचा उपयोग प्रामुख्याने शेतकरी पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी वापर करतात. यात इरले-घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मात्र आता बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे ग्रामीण भागातून पळसाच्या पानाचे घोंगडे दुर्मिळ होत आहे.

सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळत असल्याने पान-घोंगडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार व मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून पान- घोंगडी बनविण्याचे काम करत. यातून आदिवासी बांधवांना पैसेही मिळत; परंतु जसा काळ बदलत गेला आहे, तशा रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे.

शेतीमधून बैल, नांगर हद्दपार होऊन त्याची जागा ट्रॅक्टरने व टीलरने घेतली आहे. तसेच पान घोंगडी बनविण्याचा व्यवसायही बदलत्या काळानुसार संपुष्टात येत आहे. पूर्वी पावसाळा सुरू झाला की, शेतकरी पान घोंगडी बनविणाऱ्या करागिराला ऑर्डर देऊन पान घोंगडी बनवून घेत. पण आज या पान-घोंगडीचा विसर खुद्द शेतकऱ्यांनाच पडला आहे. रेनकोट, गमबूट, प्लास्टिक टोप्या, मेनकापड यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु पान-घोंगडी बनविणाऱ्याकडे कुणीही फिरकत नाही. ५०० ते १००० रुपयांमध्ये मिळणारा प्लास्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी पान-घोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करत नाही, शरीराला ऊब नसल्यामुळे त्याला अधिक पसंती दिली जाते. हेच पान घोंगडे अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे. पान-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या पान-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

लावणीच्या कामात पाऊस आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी घोंगडे चांगलेच फायदेशीर ठरते. कितीही मुसळधार पाऊस कोसळत असला तरी पावसापासून संरक्षण होते. तसेच, घोंगडे उबदार असल्याने काम करताना थंडी जाणवत नाही.
कैलास पाटील, पाथर्डी
पूर्वीसारखी पान-घोंगड्याची मागणी आता होत नाही. त्यामुळे घोंगडी बनविण्याचे काम हाती घेतले जात नाही. पूर्वी पान-घोंगड्या बनविण्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असे. शेतकरी बनवून पान घोंगडे बनविण्यासाठी वारंवार हेलपाटे मरत असत. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या आकारात पांघोडे बनवत होतो.
दुर्गनाथ फसाळे, बुरुड,कारागीर

प्लास्टिकने घेतली पान-घोंगड्यांची जागा

शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या पान-घोंगडीची जागा आता रेनकोट, प्लास्टिक, प्लास्टिक टोप्या, मेनकापड यांनी घेतल्यामुळे पान-घोंगडी बनविण्याच्या पारंपरिक करागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात रेनकोट, मेनकापड, प्लास्टिक उपलब्ध होते. पान-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळत नसल्यामुळेही आदिवासी समाजातील कामगारांना मजुरी करून अन्य काम करून पोट भरावे लागत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक