ठाणे : यंदा मान्सूनला सुमारे महिनाभर उशिराने सुरुवात झाली असली, तरी जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केले. विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक सखल भाग जलमय झाले. अनेक वस्त्या आणि वाड्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. या नैसर्गिक आपत्तींमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक १५ मृत्यू भिवंडी तालुक्यात झाले असल्याची माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे.
जून महिन्याच्या अखेरीपासून जुलैभर ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. या कालावधीत हवामान विभागाने अनेकदा कोकण विभागासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यात ठाणे जिल्ह्याचाही समावेश होता. मुसळधार पावसामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, तर महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्ते जलमय झाले. रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. यंदा एल-निनोचा प्रभाव आणि मान्सूनला झालेला उशिराचा प्रारंभ या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली.
मागील वर्षी कल्याण तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
शासकीय आकडेवारीनुसार, यंदाच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल ठाणे तालुक्यात ५, मुरबाडमध्ये ४, शहापूरमध्ये ३, तर मीरा-भाईंदर आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये एकूण २३ जण जखमी झाले आहेत. तुलनेने, मागील वर्षी १ मे २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.