ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांत गुरुवार, २२ ऑक्टोबरपासून ३६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर भिवंडी शहरात दर बुधवारी १८ तासांची पाणी कपात करण्यात येणार आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांत गुरुवार, २२ ऑक्टोबरपासून ३६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंब्रा, दिवा, कळवा, वागळे आणि मानपाडा प्रभाग समित्यांतील काही भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यंदा पावसाळ्यानंतर झालेला कमी पाऊस, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये मान्सूनने लवकर माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार १० टक्के पाणी कपात करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ३६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद

या कालावधीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समित्यांच्या हद्दीतील सर्व भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक २ आणि नेहरूनगर, तर मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांतील पाणीपुरवठाही ३६ तास बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही कमी दाबाने पाणी

शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

दर बुधवारी १८ तासांची पाणी कपात

भिवंडी : राज्यातील जलसाठ्याचे काटकसरीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने भिवंडी शहरात दर बुधवारी १८ तासांची पाणी कपात करण्यात येणार आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने १० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार स्टेम प्राधिकरणाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय, महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक उद्याने, बागा, रस्त्यांवरील दुभाजक आणि इतर हरित क्षेत्रे तसेच बांधकाम, औद्योगिक प्रक्रिया आणि धुलाईसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्राने एकूण पाणी वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्चक्रण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित कराव्यात, असेही स्टेम प्राधिकरणाने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

आवश्यकतेनुसार कपात वाढविण्याचे निर्देश

महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची गळती रोखणे आणि पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे स्टेम प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला १० टक्के पाणी कपात लागू करून, ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार कपात वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भिवंडी शहरात पाणी वितरणाबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी होत असताना आता १८ तासांच्या पाणी कपातीमुळे नागरिकांना पाणी वापराचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

Mumbai : मेट्रो प्रकल्पांत ९ महिन्यांत ७ अपघात; MMRDA ला सुरक्षा अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश

जळगाव : गरबा खेळणाऱ्या महिलांवर हेडलाईट चमकवल्याच्या वादातून हत्या

Navi Mumbai : तलावात पैसे काढण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा मृत्यू

घुसखोराने वापरलेले दस्तऐवज सादर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे आधार प्राधीकरणाला निर्देश