ठाणे : राज्यात वाढत्या रस्ता अपघातांनी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. २०२६ हे वर्ष राज्यभर ‘दुचाकीस्वार व पादचारी बचाव अभियान’ म्हणून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून ठाणे परिवहन विभागाने यास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात २०२५ या वर्षात ३६,४५० अपघातांमध्ये १५५४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ५७ टक्के दुचाकीस्वार तर २१ टक्के पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी हेल्मेट वापर सक्तीचा करण्याबरोबरच नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे.
शहरातील अपघातप्रवण भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या समन्वयातून सुधारणा केल्या जाणार आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग, सुरक्षित पदपथ, योग्य प्रकाशव्यवस्था आणि रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून प्रत्येक अपघाताची सखोल तपासणी केली जाणार असून, अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. मागील काही वर्षांतील अपघातांची आकडेवारी तपासून वारंवार अपघात होणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट्स’वर तातडीने सुधारणा केल्या जाणार आहेत. ठाणे–भिवंडी–पाडघा–शहापूर या अतिवर्दळीच्या मार्गांवर दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे अपघात अधिक प्रमाणात घडत असल्याने, या मार्गांवर विशेष मोहिम राबवली जाणार आहे. वेगमर्यादा नियंत्रणासाठी रडारयुक्त इंटरसेप्टर वाहने तैनात करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जाणार असून, नियमांचे पालन, हेल्मेटचा नियमित वापर आणि जबाबदार वाहनचालकत्व याच माध्यमातून अपघातांचे प्रमाण कमी करता येईल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे. सुरक्षित ठाणे आणि अपघातमुक्त रस्त्यांच्या दिशेने उचललेले हे पाऊल कितपत प्रभावी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.