Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू (Photo-X)
ठाणे

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

अलीकडच्या काळात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या काही दुकानांमध्ये उंदीर, झुरळांचा वावर आणि अस्वच्छतेचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे...

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील एका मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेली मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मिठाईतून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुंब्रा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकानाची तपासणी केली. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मिठाई खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू झाल्याचा दावा

माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव जुबेर अन्सारी असे आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील 'सागर स्वीट्स' या दुकानातून खरेदी केलेली 'अफलातून' ही मिठाई खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याच दुकानातील मिठाई खाल्ल्यानंतर अन्य चार जणांचीही प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकूण पाच जणांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, जुबेर अन्सारी यांच्या मृत्यूचा आणि मिठाईच्या सेवनाचा थेट संबंध अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही. तसेच पाचही जणांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याचे कारणही अद्याप समोर आलेले नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी अहवालानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

FDA कडून मिठाईचे नमुने गोळा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंब्रा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित दुकानाची तपासणी केली. प्रशासनाने प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी मिठाईचे नमुने गोळा केले आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नमुन्यांच्या तपासणी अहवालातून मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य विषबाधेबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमधील स्वच्छता व अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अलीकडच्या काळात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या काही दुकानांमध्ये उंदीर, झुरळांचा वावर आणि अस्वच्छतेचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू आहे. स्वच्छता आणि सुरक्षेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या काही दुकाने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली असून, हजारो आस्थापनांना नियमांचे पालन करण्याबाबत नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. मुंब्र्यातील या घटनेनंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीच्या ठिकाणाच्या स्वच्छतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

RBI च्या कडक नियमामुळे आता डिजिटल फसवणूकीला आळा; सर्वसमावेशक नियमावली अखेर जाहीर

ठाण्यात छठपूजेच्या उत्सवाला गालबोट; २० वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू