ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने आता खासगी ठेकेदार नेमून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येणारा खर्चही महापालिका उचलणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
भिवंडी-आतकोली येथे १५ एकर जागेत ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारून २० वर्षांसाठी तो कार्यान्वित करण्याचे निश्चित केले होते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात दरडोई सुमारे ५०० ग्रॅम कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार महापालिका हद्दीत रोज सुमारे १२०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून त्यात साधारण ५० टक्के ओल्या कचऱ्याचा समावेश आहे. सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी विकेंद्रीत पद्धतीने महापालिका हद्दीत प्रत्येकी ५ टन क्षमतेचे विविध तंत्रज्ञानावर आधारित १६ प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. तसेच गायमुख परिसरात १९४ टन क्षमतेचे विकेंद्रीत पद्धतीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सोलराइज्ड मॅकेनिकल कंपोस्टिंग प्रकल्प’ व ‘मोबाइल कंपोस्टिंग व्हॅन’ प्रस्तावित आहेत.
पालिकेला खर्चाची चिंता
प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच महापालिका स्वतः बायोगॅस प्रकल्प उभारणार आहे. त्यानुसार यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद कशी केली जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारून त्यापोटी ठेकेदाराला येथील जागा १ रुपये प्रतिचौरस मीटर दराने उपलब्ध करून दिली जाणार होती. संबंधित ठेकेदाराला २५ वर्षे कालावधीसाठी हा प्रकल्प चालविण्यासाठी देण्याचेही निश्चित झाले होते.मात्र वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने पुन्हा नवा पर्याय पुढे आणला आहे.
तब्बल ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस
भविष्यात वाढती लोकसंख्या विचारात घेता कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. त्यानुसार निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असल्याने महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. सध्या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात निर्माण होणारा कचरा हा भिवंडी येथील आतकोली येथील ३२ हेक्टर जागेत टाकला जात आहे. त्याठिकाणी आता १५ एकर जमिनीवर तब्बल ५०० टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव जून महिन्यात झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला होता.