अतुल जाधव/ठाणे
घोटभर पाण्यासाठी शहरातील आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी रिकामी मडकी हंडी घेऊन ठाणे महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांवर धडक दिली. घोडबंदर परिसरातील १३ आदिवासी पाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील पाडे तहानलेले असून येथील रहिवाशांना पाणी मिळावे, या मागणीसाठी बुधवारी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून महापालिकेच्या माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदिवासी महिलांनी डोक्यावर रिकामी मडके आणि हंडे घेऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला.
बुधवारी भर उन्हात आदिवासी बांधव प्रभाग समिती कार्यालयावर धडकले होते. त्यानंतर सांयकाळी पाचपर्यंत त्यांनी येथे ठिय्या मांडला होता. मागील कित्येक वर्षांपासून घोडबंदर भागातील पानखंडा, बाबनोली पाडा आदींसह इतर १३ आदीवासी पाड्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. वनविभागाच्या हद्दीत येथील पाडे असल्याने त्यांना पाणी देत येत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यात येथे असलेल्या बोअरवेलला देखील आता पाणी कमी झाले आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई उद्भवल्याचे म्हटले जात आहे. यंदा उन्हाची झळ मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच बसण्यास सुरुवात झाल्याने आगामी मे आणि जून महिन्यात पाण्यासाठी हाल होऊ नयेत, या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रभाग समितीचे उपायुक्त दिनेश तायडे यांना श्रमजीवीच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे. यावेळी महिलांनी डोक्यावर मडके आणि हातात रिकामी हंडे घेऊन भर उन्हात हे आंदोलन केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रत्येक कुटुंबाला त्याच्या राहत्या घरात पाण्याचे नळ तातडीने मंजूर करून पाणीटंचाई मुक्त गावपाडे करण्यास कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा, जागेचा अडथळा निर्माण होत असल्या ठिकाणी पाणी बोअरवेल मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुरू असलेल्या पाणी पाइपलाइनला वाढीव नळ जोडणी करण्यात येऊ नये, ज्या भागात जलवाहीन्या लहान आहेत, त्यांची क्षमता वाढवून पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी श्रमजीवीच्या माध्यमातून देण्यात आला.