Thane : दिवा स्थानकात 'यमदूत'ची एंट्री; रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना दिला सुरक्षेचा संदेश (Photo - FPJ)
ठाणे

Thane : दिवा स्थानकात 'यमदूत'ची एंट्री; रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना दिला सुरक्षेचा संदेश

प्रवाशांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी सकाळी ९ ते ११ या गर्दीच्या वेळेत दोन तासांची ही मोहीम राबवण्यात आली.

किशोरी घायवट-उबाळे

ठाणे : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढत्या रेल्वे अपघातांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ठाणे रेल्वे पोलिसांनी बुधवारी (दि.१७) दिवा रेल्वे स्थानकात विशेष सुरक्षा जनजागृती मोहीम आयोजित केली.

ही मोहीम मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर, पोलिस उपायुक्त प्रज्ञा जेडगे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

गर्दीच्या वेळेत मोहीम

प्रवाशांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी सकाळी ९ ते ११ या गर्दीच्या वेळेत दोन तासांची ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ठाणे रेल्वे पोलिसांचे चार अधिकारी आणि ४५ कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) यांचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारीही मोहिमेत सहभागी झाले.

'यमदूत'च्या माध्यमातून सुरक्षेचा संदेश

या मोहिमेचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'यमदूत'च्या वेशातील व्यक्ती. रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना 'यमदूत'ने अडवून त्यांना गुलाबाचे फूल देत जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले.

याशिवाय, अधिकाऱ्यांनी स्पीकरच्या माध्यमातून सुरक्षाविषयक घोषणाबाजी केली. "एक गाडी गेल्यानंतर लगेच दुसरी गाडी येऊ शकते," याची जाणीव करून देत प्रवाशांना पादचारी पूल (FOB) वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

रुळ ओलांडण्यास प्रत्यक्ष प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ दरम्यान मानवी साखळीही तयार केली.

मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलिस निरीक्षक केंद्रे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. प्रवाशांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना