शहरातील बहुतांशी डोंगर परिसरात झोपड्यांमध्ये राहणारे नागरिक पावसाळ्याच्या दिवसात रोजची रात्र जीव मुठीत धरून ढकलत आहेत. डोंगर परिसरातील दुर्दशा पाहता या झोपड्यांवर दरड कोसळण्याची भीतीचे वृत्त दैनिक नवशक्तिच्या दिनांक २८ मे च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात ही भीती खरी ठरली असून मुंब्र्याच्या डोंगराळ परिसरात घरांवर दरड कोसळून एका महिलेचा बळी गेला तसेच तेथील १४ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामुळे डोंगराळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य आहे. या बेकायदा बांधकामामुळे शहराच्या नियोजनावर मोठा परिणाम झाला आहे.
ठाणे महापालिका तसेच इतर जबाबदार सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी या भागातील डोंगर उतारावरील झोपड्यावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता या भागातील रहिवाश्ाांना सावधानतेचा इशारा पालिकेतर्फे देण्यात येतो. तशाच प्रकारचा इशारा एमआयडीसीकडूनही देण्यात येतो.
यंदाही अशा जाहीर सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर कोणतीच काळजी घेण्यात आली नव्हती. वारलीपाडा, रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर येथील काही झोपड्या डोंगरावर आणि डोंगर उतारावर आहेत. रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर येथील जागा एमआयडीसीची आहे. डोंगराचा भाग हा पावसाच्या पाण्यामुळे कमकुवत झाला असल्याने दरड कोसळून दुर्घटना होऊ शकते. २००५ सालच्या माहितीनुसार ठाणे महापालिका हद्दीत वन विभागाच्या जमिनीवर अवघी १३ हजार ८२४ बेकायदा बांधकामे होती. ती आता गेल्या १४ वर्षात वाढून लाखोंच्या घरात गेली असण्याची शक्यता आहे.
कळवा, विटावा, खारेगाव, पारसिकनगर, कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर, आनंद नगर, गणपत पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर, मुंब्रा, कौसा, पारसिक डोंगर, वागळे मामाभाचा डोंगर,घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असून या परिसरातील अनधिकृत झोपड्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षांतील इमारत दुर्घटना
२०१२ साली मुंब्रा परिसरात घरावर संरक्षक भिंत कोसळून सात जण ठार झाले होते.
२०१० च्या पावसाळ्यात ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर येथे चार घरांवर भिंत कोसळल्यामुळे आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.
एप्रिल २०१३ मध्ये शिळफाटा येथील लकी कंपाऊंड इमारत दुर्घटनेत ७४ बळी गेले होते. त्यानंतर दोनच महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंब्रा स्टेशन जवळील स्मृती इमारत कोसळली आणि दहा जणांचे बळी गेले.
२०१४ साली कृष्ण निवासमध्ये रहाणाऱ्या १२ जणांचे बळी गेले. याच प्रकारे भिवंडीत २१ जुलै २०१६ या दिवशी इमारत कोसळून ८ बळी, डोंबिवली २८ जुलै २०१५ या दिवशी ९ मृत्यू , भिवंडीत २५ नोव्हेंबर २०१७ रोजी ४ नागरिक गाडले गेले. ७ ऑगस्ट २०१६ हनुमान टेकडी भागात ८ बळी तर भिवंडीतच २०१९ साली २४ ऑगस्ट २०१९ रोजी इमारत कोसळून २ जणांचा मृत्यू झाला. २०२० साली कळवा पूर्वेच्या घोलाई नगर झोपडपट्टीत दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच निरपराधांचे बळी गेले.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात राबोडीत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले तर यंदा मुंब्र्यात घरावर दरड कोसळून एका महिलेचा बळी गेला.