जव्हार : समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचावर असणाऱ्या जव्हार शहर तथा ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडतो. पावसामुळे शहरातील गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे. चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकी वाहने अधिक प्रमाणात नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे विशेषकरून दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज चालकांना सुगीचे दिवस आल्याचे गॅरेजमधील गर्दीवरून दिसत आहे.
पावसाळा सुरू झाला, की पावसाच्या पाण्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. दुचाकी, चारचाकी वाहनांचा यात समावेश असतो. त्यातल्या त्यात दुचाकीचे प्रमाण अधिक असते. चारचाकी वाहनांचे इंजिन बंदिस्त असल्याने सहसा पावसाचा त्यावर परिणाम होत नाही. मात्र दुचाकीचे इंजिन पूर्णत: उघडे असल्याने पावसाचे पाणी जाऊन नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. प्लग शॉर्ट होऊन भर पावसात रस्त्यांवर दुचाकी बंद पडत आहेत. गॅरेजमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने वाहनचालक सरळ गॅरेज गाठत आहेत. रस्त्यावर साचणारे पाणी विशेषत: वाहन रस्त्याने धावताना प्लगमध्ये पाणी जाऊन प्लग शॉर्ट होत आहे. त्याचप्रमाणे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यात वाहने फसून वाहनांचे अपघात होऊन नुकसान होते. वाहन जागेवरच बंद पडते. अशा एक ना अनेक समस्या पावसामुळे निर्माण होत असल्याने सध्या गॅरेज व्यवसाय तेजीत आला आहे. ठिकठिकाणी असलेले दुचाकीचे गॅरेज नादुरुस्त वाहनांनी भरलेले दिसत आहे. गॅरेज चालकाला वाहनांचे काम करण्यासाठी अतिरिक्त कामगारांची आवश्यकता भासत आहे.
दुचाकी नादुरुस्तीचे कारणे
पावसाच्या पाण्याने प्लग शॉर्ट होणे, पेट्रोल टँकमध्ये पाणी जाणे, खड्ड्यांमध्ये वाहने फसून नुकसान होणे, रस्त्यावर वाहने घसरून वाहनाचे नुकसान होणे, वायरिंग शॉर्ट होणे, पंक्चर होणे, कार्बोरेटरमध्ये पाणी, कचरा साचून वाहन बंद पडणे, ब्रेक न लागणे या कारणांमुळे वाहने नादुरुस्त होत आहेत.
स्पेअर पार्ट व्यवसाय जोमात
गॅरेज व्यवसायावर स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय अवलंबून आहे. वाहनांची दुरुस्ती करत असताना विविध वस्तूंची आवश्यकता भासत असते. त्या वस्तू स्पेअर पार्ट विक्रेता दुकानावर उपलब्ध असल्याने नागरिक त्या खरेदी करत असतात. ब्रेक लायनर, ब्रेक ऑइल, प्लग यांसह विविध वस्तूंची खरेदी-विक्री अधिक होत असल्याने त्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे स्पेअर पार्ट व्यवसायही तेजीत आहे.