उल्हासनगर शहरात पाणीटंचाईचे संकट; बारवी धरण आटतेय, नागरिकांची चिंता वाढतेय 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

उल्हासनगर शहरात पाणीटंचाईचे संकट; बारवी धरण आटतेय, नागरिकांची चिंता वाढतेय

बारवी धरणातील झपाट्याने घटणारा जलसाठा, वारंवार होणारी पाणीकपात आणि टँकरच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे उल्हासनगर शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे.

Swapnil S

उल्हासनगर : बारवी धरणातील झपाट्याने घटणारा जलसाठा, वारंवार होणारी पाणीकपात आणि टँकरच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे उल्हासनगर शहरातील पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. नळांना आधीच कोरडेपणा आला असताना आता टँकर टंचाईमुळे हजारो नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना नागरिक मात्र टँकर माफियांच्या मनमानी दरांच्या विळख्यात अडकले आहेत.

उल्हासनगरातील अनेक सोसायट्या आणि बहुमजली इमारतींमध्ये सलग दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पिण्याचे आणि दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील अनेक भागांत पाण्यासाठी हाहाकार माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या संकटामागे बारवी धरणातील घटता जलसाठा हे प्रमुख कारण मानले जात आहे.

यंदा धरणात केवळ २७.६६ टक्के पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ३६.६९ टक्के होता. जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने २४ तासांची पाणी कपात लागू केली असली, तरी नागरिकांच्या मते ही कपात प्रत्यक्षात ४८ तासांच्या गैरसोयीमध्ये बदलली आहे. अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महापालिकेने एका टँकरसाठी ७५० रुपये दर निश्चित केला असला, तरी टँकर्सच्या अपुऱ्या उपलब्धतेचा फायदा घेत काही खासगी टँकरचालकांकडून १,५०० ते २,००० रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या अघोषित पाणी कपातीमुळे नागरिकांचा संताप वाढला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांना ४८ तासांचा त्रास

शहरात लागू करण्यात आलेली २४ तासांची पाणी कपात प्रत्यक्षात नागरिकांसाठी ४८ तासांच्या संकटात रूपांतरित झाल्याची तक्रार होत आहे. कपातीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असल्याने अनेक भागांमध्ये दोन दिवस नळ कोरडे राहत आहेत. परिणामी नागरिकांचे दैनंदिन नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

टँकर माफियांची मनमानी

महापालिकेने टँकरचा अधिकृत दर ७५० रुपये निश्चित केला असला, तरी पाण्याच्या तीव्र टंचाईचा फायदा घेत काही खासगी टँकरचालकांकडून १,५०० ते २,००० रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पाण्याच्या गरजेपुढे हतबल झालेल्या नागरिकांनी टँकर माफियांच्या मनमानीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

IAF AN-32 Aircraft Crash : लँडिंगदरम्यान अनर्थ! जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, VIDEO समोर

... म्हणून तक्रार करत नाही; पारंपरिक समाजात लैंगिक गुन्ह्यांविरोधात कुटुंब कचरतात - न्यायालय

"प्लिज मला एक संधी द्या, चांगला माणूस बनून दाखवेन"; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेची जाहीर माफी, VIDEO

विद्यार्थ्यांना मिळणार ST चे डिजिटल ‘रुपे’ कार्ड; सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना, विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रियेला गती

ठाण्यात अनधिकृत ३७ शाळांविरोधात गुन्हे दाखल; ५८ शाळांची यादी जाहीर, दिवा परिसरात सर्वाधिक शाळा